सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा या काळातील सर्वात यशस्वी सलामीवीरांपैकी एक आहे, तर महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून मोठे यश संपादन केले होते. महानतेच्या दृष्टीने, दोघांची बरोबरी होऊ शकत नाही. पण, रोहितने आतापर्यंत खेळलेल्या सामन्याद्वारे त्यांची आकडेवारीची तुलना मात्र होऊ शकते.
सचिन तेंडुलकर महान क्रिकेटपटूंपैकी एक होता. नोव्हेंबर २०१४ मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परंतु, आजही तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतर कुठल्याही फलंदाजांच्या धावा त्याच्या जवळपास नाहीत.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सचिन कधी मधल्या फळीत, तर कधी वरच्या फळीत फलंदाजी करत होता. पण, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन सलामीवीर म्हणून अफलातून होता.
२७ मार्च १९९४ रोजी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरूद्ध ऑकलंड येथे प्रथम एकदिवसीय सामन्यात सलामी दिली. तेथे त्याने ४९ चेंडूंत ८२ धावा केल्या. त्यामध्ये १५ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. या जागेवर आत्मविश्वासाने कामगिरी केल्यामुळे सचिनला नियमित सलामीवीर म्हणून संधी मिळाल्या आणि त्याने त्या संधीचे सोने केले.
आपल्या वनडे कारकीर्दीच्या ७५% पेक्षा जास्त डावांमध्ये त्याने सलामीवीर म्हणून काम केले. सलामीवीराच्या भूमिकेत, ३४० एकदिवसीय डावात ४८.२९ च्या सरासरी आणि ८८.५० च्या स्ट्राइक-रेटने १५,३१० धावा केल्या. एकदिवसीय सलामीवीर म्हणून त्याने ४५ शतके आणि ७५ अर्धशतके झळकावली आहेत. सचिन एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज होता. ती खेळीदेखील सलामीवीर म्हणून आली होती.
दुसरीकडे, रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीसुद्धा बहरली आहे . क्रिकेटच्या प्रत्येक प्रारूपात सलामीवीर म्हणून त्याने स्वत: ला असाधारण स्तरावर नेले आहे.
एकदिवसीय सलामीवीर म्हणून १३८ डावात रोहितने ५८.११ च्या सरासरीने आणि ९२.२६ च्या स्ट्राइक-रेटने ७,१४८ धावा केल्या आहेत. सलामीवीर म्हणून रोहितने आतापर्यंत, २७ शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात, मधल्या फळीचा फलंदाज म्हणून केलेल्या रोहितने २०१३ पासून सलामीला येत विक्रमी तीन द्विशतके केली आहेत.
सचिन तेंडुलकर विरुद्ध रोहित शर्माः एकदिवसीय सलामीवीर म्हणून
सचिन तेंडुलकर / रोहित शर्मा
सामने- ३४४ / १४०
डाव – ३४०/ १३८
धावा- १५,३१०/ ७,१४८
सर्वोच्च- २००*/ २६४
सरासरी- ४८.२९/ ५८.११
स्ट्राईक रेट- ८८.५०/ ९२.२६
अर्धशतकं- ७५ / ३१
शतकं- ४५/ २७
प्रत्येक शतकासाठी घेतलेले डाव- ७.६ / ५.१
सध्याची रोहित शर्माची आकडेवारी सचिन तेंडुलकरपेक्षा सरस असली तरी दोघेही वेगवेगळ्या पिढ्यांतील खास सलामीवीर फलंदाज आहेत. सचिन आणि रोहितच्या काळातील एकदिवसीय क्रिकेट खूप वेगळं आहे. त्यामुळे आकडेवारीचा विचार न करता फक्त त्यांच्या खेळाचा आनंद घेतलेला बरा.