टी20 क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या फॉरमॅटच्या सुरुवातीपासून, अनेक फ्रँचायझी लीग सुरू झाल्या आहेत. या लीग केवळ सक्रिय खेळाडूंनाच नव्हे तर निवृत्त खेळाडूंनाही त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी देतात. अशीच आणखी एक लीग सुरू होणार आहे, तिचे नाव आहे इंटरनॅशनल मास्टर्स लीग. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरही या लीगमध्ये आपले कौशल्य दाखवणार असून, सुनील गावसकर यांना या लीगचे आयुक्त करण्यात आले आहे. या लीगचे सामने मुंबई, लखनौ आणि रायपूर येथे होणार आहेत.
इंटरनॅशनल मास्टर्स लीग (IML) ही वार्षिक टी20 क्रिकेट स्पर्धा असेल, ज्यामध्ये सुरुवातीला भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि श्रीलंका या सहा क्रिकेट खेळणाऱ्या देशांतील खेळाडूंचा समावेश असेल. या लीगमध्ये अनेक निवृत्त दिग्गज दिसणार आहेत. ज्यामुळे चाहत्यांना जुन्या आठवणी ताज्या करण्याची संधी मिळेल. भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरच्या पुनरागमनाने लाखो चाहत्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण केला आहे. तो पुन्हा एकदा 22 यार्डच्या खेळपट्टीवर बॅटने धावा काढताना दिसेल.
आयएमएलबाबत सचिन तेंडुलकर म्हणाला की, “क्रिकेटची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर जगभरात वाढत आहे. गेल्या दशकभरात, टी20 क्रिकेटने त्याचा प्रसार वेगाने केला आहे. नवीन चाहत्यांना या खेळाकडे आकर्षित केले आहे. आता सर्व वयोगटातील चाहत्यांना जुन्या खेळाडूंना नवीन फॉरमॅटमध्ये खेळताना पाहता येणार आहे.”
तो पुढे म्हणाला, “खेळाडू मनापासून कधीच निवृत्त होत नाहीत आणि अनेकदा मैदानात परतण्यास उत्सुक असतात. मला खात्री आहे की, सहभागी होणारे सर्व खेळाडू पुन्हा लयीत येतील आणि जोरदार तयारी करतील. जेव्हा आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा आपल्याला सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळायचे असते आणि जिंकण्याचा प्रयत्न करायचा असतो.”
यापूर्वी सचिन निवृत्त झाल्यानंतर रोड सेफ्टी सिरीजमध्ये इंडिया लिजेंडस संघासाठी खेळताना दिसला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहली आणि पंतमध्ये पुन्हा वाद! धाव काढताना गोंधळ उडाल्याने थोडक्यात बचावला विराट, मग…
टीम इंडियाच्या तुफानापुढे बांगलादेशची अवस्था खराब, कानपूर कसोटी रोमांचक वळणावर
भारताची खतरनाक फलंदाजी! असा पराक्रम पुन्हा होणे नाही, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात हे प्रथमच घडलं