भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील आठवणींना उजाळा दिला आहे. याविषयी बोलताना त्याने सांगितले की, “त्यावेळेला त्याला जास्त समजत नसल्याने त्याला असे वाटले होते की, जेव्हा तो चांगले खेळणार नाही तेव्हा त्याचे सगळे काही संपून जाईल.”
पण सचिनला नंतर रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) समजावले होते. त्यामुळे सचिनमध्ये (Sachin Tendulkar) आत्मविश्वास निर्माण झाला होता. पुढे पदार्पणाच्या कसोटी सामन्यानंतर २४ वर्षांनी आपला शेवटचा कसोटी सामना खेळत सचिनने २०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम पूर्ण केला होता.
सचिनने स्कायस्पोर्ट्सवर झालेल्या ‘नासिर मीट्स सचिन’ शो दरम्यान नासिर हुसैनला सांगितले की, “मला मान्य करावे लागेल की मला माहिती नव्हते. मी माझा पहिला कसोटी सामना विद्यालयीन सामन्याप्रमाणे खेळला होता.”
१९८९ साली सचिनने पाकिस्तानविरुद्धच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी त्याला इमरान खान (Imran Khan), वसीम अक्रम (Wasim Akram) आणि वकार युनुस (Waqar Younis) या वेगवान गोलंदाजांचा सामना करायचा होता.
याविषयी बोलताना सचिन म्हणाला की, “वसीम आणि वकार हे खूप वेगाने चेंडू टाकत होते आणि ते शॉर्ट गोलंदाजीही करत होते. याशिवाय जेवढ्या खतरनाक गोष्टी करता येतील तेवढ्या ते करत होते. मी त्यापुर्वी कधीच अशा गोलंदाजीचा सामना केला नव्हता. त्यामुळे माझा पहिला सामना चांगला ठरला नव्हता.”
सचिन पुढे म्हणाला की, “मधे-मधे तर मला त्यांच्या वेगवान आणि उसळी चेंडूनी खूप त्रास दिला. मी अवघ्या १५धावांवर बाद झालो आणि ड्रेसिंग रूममध्ये जाताना मला माझ्या कामगिरीची खूप लाज वाटत होती. मी विचार करत होतो की, ‘हे तू काय केलस, तू का असा खेळलास.’ आणि मी जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये पोहोचलो, तेव्हा मी सरळ बाथरूममध्ये गेलो आणि रडायला लागलो.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कित्येक फलंदाजी विक्रम करणाऱ्या सचिनला वाटले की, तो चांगला आंतरराष्ट्रीय खेळाडू नव्हता.
तो म्हणाला, “मला वाटले होते की मी अजिबात चांगला खेळाडू नाही. त्यावेळी मी स्वत:लाच प्रश्न केला आणि म्हटले, ‘असं वाटतय की हा माझा पहिला आणि शेवटचा सामना असणार’. मला वाटू लागले मी या स्तरावर खेळण्यासाठी योग्य नाही. मी त्यावेळी खूप निराश होतो.”
“पण पुढे तत्कालीन भारतीय संघसहकारी शास्त्री यांना बोलून मला बरीच मदत झाली. मला आजही त्यांनी म्हटलेल्या गोष्टी आठवत आहेत. शास्त्री मला म्हणाले होते की, तू हा सामना विद्यालयीन सामन्याप्रमाणे खेळलास. जर तू सर्वश्रेष्ठ गोलंदाजांविरुद्ध खेळत असशील तर तू त्यांच्या गोलंदाजी क्षमतेचा आणि कौशल्याचा सन्मान करायला हवा,” असे शास्त्रींबद्दल सचिनने सांगितले.
तर, शास्त्रींना आपण दिलेल्या प्रत्युत्तराबाबत सचिन म्हणाला की, “तेव्हा मी शास्त्रींना म्हणालो होतो, मला पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या वेगाचा त्रास झाला होता. यावर शास्त्रींनी मला म्हटले होते, असे होत असते, तू काळजी करू नको. जेव्हा तू खेळपट्टीवर उतरशील तेव्हा अर्धा तास कसा बसा घालवायचा. मग तू हळू हळू गोलंदाजांच्या वेगाशी ताळमेळ राखू लागशील आणि सगळं व्यवस्थित होईल.”
पुढे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सचिनने ४ चौकांरासह ५९ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये करोडोंची कमाई करुन मालामाल झालेले ५ अष्टपैलू
-आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेली काॅफी पंड्याला पडली भलतीच महागात
-जर आयपीएल झाली नाही तर १० कोटींवर पाणी सोडावे लागणारे ५ खेळाडू