मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगभरातील अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा आहे. त्याची विकेट घेणे हे अनेक युवा गोलंदाजांसाठी स्वप्नवत कामगिरी असते. असेच सचिनची विकेट भारताचे गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि पियुष चावलासाठी देखील एक अविस्मरणीय क्षण ठरला होता. या दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाआधी सचिनची विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधले होते.
भुवनेश्वरने २००८-०९ च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात उत्तरप्रदेशकडून मुंबई विरुद्ध खेळताना सचिनला शुन्यावर बाद केले होते. भुवनेश्वर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सचिनला शुन्यावर बाद करणारा पहिला गोलंदाज ठरला होता. त्या सामन्यात सचिनचा झेल शिवकांत शुक्लाने घेतला होता. विशेष म्हणजे त्यावेळी भुवनेश्वर केवळ १९ वर्षांचा होता. या अविस्मरणीय विकेटच्या आठवणी भुवनेश्वरने पुन्हा ताज्या केल्या आहेत.
इएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना भुवनेश्वर म्हणाला, ‘माझ्या कारकीर्दीसाठी हा एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला. त्या सामन्यापूर्वी मी त्या मोसमात ३०-३५ विकेट्स घेतल्या होत्या, पण सचिन पाजीची विकेट घेतल्यानंतर माझ्या आधीच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष गेले. कोण आहे हा मुलगा, काय केले आहे त्याने? अशा प्रश्नांसह लोकांनी माझ्या आधीच्या कामगिरीची आकडेवारी काढणे सुरु केले. त्यावेळी लोकांना हे देखील लक्षात आले की मी आधीसुद्धा चांगली कामगिरी केली आहे. पण ती विकेट माझ्यासाठी टर्निंग पाँइंट होती, कारण त्यानंतर लोकांचे माझ्याकडे लक्ष वेधले गेले.’
या विकेटनंतर २०१२ ला भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भुवनेश्वरने याआधीही काही दिवसांपूर्वी युट्यूवरील ‘डबल ट्रबल’ या स्म्रीती मंधना आणि जेमिमा रोड्रिगेज होस्ट करत असलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की सचिनची विकेट त्याला मिळण्यात त्यावेळच्या उत्तर प्रदेशचा कर्णधार मोहम्मद कैफचाही वाटा होता. कैफने चांगले क्षेत्ररत्रण लावले होते.
सचिनची जरी भुवनेश्वरने विकेट घेतली असली तरी तो सामना मुंबईने २४३ धावांनी जिंकत रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. त्या सामन्यात रोहित शर्माने दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. रोहितने पहिल्या डावात १४१ धावा आणि दुसऱ्या डावात १०८ धावा केल्या होत्या.
याबरोबरच काही दिवसांपूर्वीच पियुष चावलाने देखील तो १६ वर्षांचा असताना सचिनची विकेट घेतल्याच्या आठवणीबद्दल सांगितले होते. २००५ ला झालेल्या चॅलेंजर्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात चावलाने सचिनला बाद केले होते. त्यावेळी सचिन टेनिस एल्बोच्या दुखापतीनंतर चॅलेंजर्स ट्रॉफीमधून क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमन करत होता.
त्या सामन्यात सचिन भारतीय वरिष्ठ संघाकडून (India Seniors team) खेळत होता. तर चावला भारत ब संघाकडून खेळत होता. त्यावेळी १७८ धावांचा पाठालाग करताना भारतीय वरिष्ठ संघाकडून फलंदाजीसाठी उतरलेल्या सचिनला ७ व्या षटकात चावलाने २२ धावांवर त्रिफळाचीत केले होते.
या विकेटची आठवण अरुण वेणूगोपाल यांच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना चावलाने सांगितली आहे. तो म्हणाला, ‘पार्थिव पटेल या विकेटच्या मागे होते. दिनेश मोंगिया कर्णधार होता. जेव्हा आपण १५-१६ वर्षांचे असता आणि सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करत असता तेव्हा एकतर तुम्ही चिंताग्रस्त असता किंवा रिलॅक्स असता. सुदैवाने सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करताना मी रिलॅक्स होतो.’
‘जरी सचिन पाजीने माझे चेंडूवर मोठे फटके मारले असते, तरी काही फरक पडला असता का? जर सचिन पाजी शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन आणि ग्लेन मॅकग्रा सारख्या गोलंदाजांना फटकावतो तर त्याने माझ्या गोलंदाजीवर मोठे फटके मारणे ही मोठी गोष्ट नव्हती. त्यामुळे त्यावेळी माझ्याकडे हरण्यासारखे काही नव्हते. मी फक्त सचिन पाजीला गोलंदाजी करण्याच्या क्षणाचा आनंद घेत होतो.’
विशेष म्हणजे त्यानंतर १ वर्षाने चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये पुन्हा सचिन आणि चावला आमने-सामने आले तेव्हा सचिनने चावलाच्या १ षटकात जवळपास २० धावा काढल्या होत्या. याबद्दल चावला म्हणाला की सचिनने माझ्या गोलंदाजीवर मोठे फटके मारले तरी ही मोठी गोष्ट नाही. कारण त्याने बर्याच गोलंदाजांना फटकावले आहे.
चावलाने त्यानंतर २००६ मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
व्हिडीओ- अखेर क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीने सुरु केली ऑरगॅनिक शेती, ट्रॅक्टरने केली…
लॉकडाऊनमध्ये युवकांनी बनवलं शानदार क्रिकेट मैदान, ६०० ट्रक कचरा…
इंग्लंडकडून खेळण्यासाठी तयार आहे हा भारतीय, होणार तिसरा गोलंदाज