मुंबई । कोरोना महामारीच्या सावटातच आठ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेत मूळचा भारतीय असलेला फिरकी गोलंदाज अमर विरदी यास देखील इंग्लंडच्या संघात सामील करून घेण्यात आले आहे.
ऑफस्पिनर अमर विरदी यांच्याकडे अनुभव कमी आहे. पण तो वेस्टइंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळाल्यास तो इंग्लंडकडून खेळणारा तिसरा भारतीय फिरकी गोलंदाज असेल.
अमर विरदी यांच्यापूर्वी रवी बोपारा, मॉन्टी पानेसर हे मूळचे भारतीय असलेले गोलंदाज इंग्लंडकडून खेळले आहेत. अंतिम अकरा जणांच्या संघात निवड व्हावी, यासाठी अमर जीव तोडून मेहनत घेत आहे.
अमर म्हणाला, “निश्चितच मी पहिला कसोटी सामना खेळू इच्छितो. मला माझ्यावरच खूप गर्व आहे, की मी इथंपर्यंत पोचलो. संघात स्थान बनवणे हा माझा पुढचा टप्पा असेल. यासाठी मी मेहनत करेन. मी माझे कौशल्य पणाला लावले आहे. सध्या तर संघात स्थान मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.”
21 वर्षीय अमर विरदी याच्याकडे 23 प्रथम श्रेणीचे सामने खेळण्याचा अनुभव आहे. इंग्लंडच्या संघात सध्या फिरकी गोलंदाजीमध्ये स्पर्धा सुरू आहे. जॅक लीच, डॉम बेस, मॅट पार्किंसन आणि मोइन अली यांची देखील या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. अमरने 23 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 69 बळी घेतले आहेत. हा फिरकीपटू फारच आक्रमक असून सतत विकेट घेण्यावर त्याची नजर असते.
“मला वाटते की, खेळपट्टीकडून साथ मिळो अथवा न मिळो आपण सतत आक्रमक आणि विकेट घेण्यासाठी तयार असले पाहिजे. विकेट घेऊ शकला नाही तर कमीत कमी फलंदाजाला धावा काढण्यापासून रोखले पाहिजे. परिस्थिती कशीही असो माझी नजर केवळ विकेट घेण्यावर असते,” असे अमर विरदीने सांगितले.