2011 चा आयसीसी विश्वचषक भारतीय संघाने जिंकल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतीय संघातील खेळाडूंनी खांद्यावर उचलून वानखेडे स्टेडियमवर फेरी मारली होती. या क्षणाला मागील ‘दोन दशकातील लॉरियस क्रिडा क्षेत्रातील सर्वोत्तम क्षण'(Laureus Sporting Moment Award 2000-2020) हा पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार सचिनने बार्लिन येथे झालेल्या लॉरियस क्रिडा पुरस्कार सोहळ्यात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार स्टिव्ह वॉच्या हस्ते स्विकारला. यावेळी विजेत्या सचिनच्या नावाची घोषणा दिग्गज टेनिसपटू बोरिस बेकर यांनी केली.
हा पुरस्कार स्विकारल्यानंतर सचिन म्हणाला, ‘तो क्षण अदभूत होता. विश्वचषक जिंकण्याची भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. असे किती स्पर्धा होतात जिथे कोणतीही मिश्रित मते नसतात. खूप क्वचित संपूर्ण देश सलिब्रेशन करतो.’
‘हा एक खेळ किती शक्तिशाली आहे आणि आपल्या जीवनावर कोणती जादू करतो याची हा क्षण आठवण करून देतो. आजही मी जेव्हा ते सर्व पाहतो तेव्हा वाटते की सर्व आजही माझ्याबरोबर आहे.’
यानंतर बेकर यांनी सचिनला 2011 च्या विश्वचषक विजयानंतर काय भावना होत्या, याबद्दल बोलण्यास सांगितले. यावर सचिन म्हणाला, ‘माझा प्रवास 1983ला सुरु झाला, जेव्हा मी 10 वर्षाचा होतो. भारताने तेव्हा पहिला विश्वचषक जिंकला होता. तेव्हा मला त्याचे महत्त्व कळले नाही, पण प्रत्येकजण सेलिब्रेशन करत होते, मीही पार्टीत सामील झालो.’
‘पण मला कुठेतरी माहित होते, देशामध्ये काहीतरी खास झाले आहे आणि मला याचा एक दिवसतरी अनुभव घ्यायचा होता. अशाप्रकारे माझा प्रवास सुरु झाला.’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 664 सामने खेळणारा सचिन पुढे म्हणाला, ‘हा क्षण माझ्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण आहे. 22 वर्षांपासून विश्वविजेतेपदाचा मी पाठलाग करत होतो. पण मी कधीही आशा सोडली नव्हती. मी ती ट्रॉफी माझ्या देशवासिंयांच्यावतीने उचलत होतो.’
https://twitter.com/LaureusSport/status/1229499483203031040
त्याचबरोबर सचिनने दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारक नेते नेल्सन मंडेला यांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वावर कसा मोठा प्रभाव पाडला याबद्दलही सांगितले.
तो म्हणाला, त्याच्या कष्टाचा परिणाम त्यांच्या नेतृत्वावर झाला नाही. त्यांचा बर्याच संदेशांपैकी खेळामध्ये प्रत्येकाला एकत्र आणण्याची शक्ती आहे, हा संदेत सर्वात महत्त्वाचा वाटतो.
https://twitter.com/ICC/status/1229556778834309121






