महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 मध्ये सोमवारी (9 जून) ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स हा सामना खेळला गेला. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात नाशिक संघाने चार गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात नाशिक संघाचा युवा फलंदाज साहिल पारख याने खेळलेल्या एका फटक्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्सविरूद्ध नाशिक संघाला 135 धावांचे आव्हान मिळाले होते. मंदार भंडारी याच्या रूपाने पहिला गडी लवकर बाद झाल्यावर साहिल पारख हा मैदानात उतरला. त्याने दडपण न घेता केवळ 16 चेंडू खेळताना चार उत्तुंग षटकारांच्या मदतीने 27 धावा बनवल्या. आपल्या या छोट्याशा खेळीदरम्यान त्याने मारलेला एक षटकार सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. साहिल याने तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट मारला.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस याच्याप्रमाणे हा फटका मारला गेला. हा फटका थेट सीमारेषेपार जाऊन पडला. त्याच्या या फटक्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. अनेक जण त्याला भविष्यातील एमएस धोनी तर काही महाराष्ट्र क्रिकेटचे भविष्य म्हणत आहेत.
या सामन्याचा विचार केल्यास, ईगल नाशिक टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मनोज इंगळे व अर्शिन कुलकर्णी यांनी केवळ 54 धावांमध्ये कोल्हापूरचे पहिले चार फलंदाज माघारी पाठवले होते. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या कर्णधार प्रशांत सोलंकी याने मधली फळी कापून काढली. त्यामुळे कोल्हापूर संघाला केवळ 134 धावांपर्यंत मजल मारता आली. सोलंकी याने सर्वाधिक चार बळी मिळवले. या धावांचा पाठलाग करताना अर्शिन कुलकर्णी याने 42, साहिल पारख याने 27 व रोहन दामले याने 45 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कोल्हापूरसाठी सर्व चार बळी वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी याने टिपले. अष्टपैलू कामगिरी करणारा अर्शिन कुलकर्णी सामनावीर ठरला.






