आयपीएल 2025 मध्ये दररोज नव्या घडामोडी पाहायला मिळत असून, ऑरेंज कॅपसाठीची स्पर्धा चुरशीची झाली आहे. गुरुवारी सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती. मात्र, अवघ्या 24 तासांत त्याच्याकडून ही कॅप गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शनने पुन्हा मिळवली आहे.
गुरुवारी जयपूरमध्ये झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 23 चेंडूत नाबाद 48 धावा करत दमदार खेळी केली. या कामगिरीनंतर त्याच्या एकूण धावा 11 सामन्यांत 475 इतक्या झाल्या. यामध्ये त्याची सरासरी 67.85 असून स्ट्राईक रेट 172.72 आहे. या मोसमात त्याने तीन अर्धशतके ठोकली आहेत.
या सामन्यानंतर सूर्या आयपीएल 2025 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. दरम्यान साई सुदर्शन दुसऱ्या स्थानावर घसरला गेला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात साई सुदर्शनने आपल्या कामगिरीत वाढ करत पुन्हा अव्वल स्थान मिळवले.
साई सुदर्शनने आतापर्यंत 10 सामन्यांत 483 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 53.66 असून स्ट्राईक रेट 152.36 आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये सलग 11 डावांत 25 पेक्षा अधिक धावा करत एक नवा विक्रमही केला आहे. यापूर्वी 2014 मध्ये रॉबिन उथप्पाने सलग 10 डावांत ही कामगिरी केली होती. अश्या स्थितीत आता उर्वरित सामन्यांमध्ये हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की अंतिमतः ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावर राहते.






