भारतीय बॅडमिंटनमधील सुवर्णपान असलेल्या सायना नेहवाल हिने अखेर खेळातून निवृत्ती (संन्यास) घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून गंभीर गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत असलेल्या सायनाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, आता तिचं शरीर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा ताण सहन करण्याच्या स्थितीत राहिलेलं नाही. लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या सायनाने अखेरचा स्पर्धात्मक सामना सिंगापूर ओपन 2023 मध्ये खेळला होता, मात्र त्या वेळी तिने औपचारिक निवृत्तीची घोषणा केली नव्हती.
एका पॉडकास्टमधील संवादात सायनाने आपल्या निर्णयामागची भूमिका उलगडली. ती म्हणाली, “मी जवळपास दोन वर्षांपूर्वीच खेळणं थांबवलं होतं. मी हा खेळ माझ्या अटींवर सुरू केला आणि माझ्याच निर्णयाने त्यातून बाहेर पडले. त्यामुळे वेगळी घोषणा करण्याची गरज वाटली नाही.” एखादा खेळाडू शारीरिकदृष्ट्या पुढे खेळू शकत नसेल, तर ते स्वीकारणंच योग्य असल्याचं मतही तिने व्यक्त केलं.
माजी जागतिक क्रमांक-1 असलेल्या सायनाने आपल्या गुडघ्यांच्या अवस्थेबाबत धक्कादायक माहिती दिली. तिच्या मते, गुडघ्यातील कार्टिलेज पूर्णपणे झिजलेली असून तिला आर्थरायटिसचा त्रास आहे. “मी माझ्या आई-वडिलांना आणि प्रशिक्षकांनाही सांगितलं की आता कदाचित मी पुढे खेळू शकणार नाही,” असं सायना म्हणाली. औपचारिक संन्यासाची घोषणा न करता हळूहळू लोकांना आपोआप कळेल, असंही तिने स्पष्ट केलं.
सायनाने सांगितलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहण्यासाठी दररोज 8 ते 9 तास कठोर सराव आवश्यक असतो. मात्र तिचे गुडघे आता 1 ते 2 तासांचाही सराव सहन करू शकत नव्हते. सरावानंतर गुडघ्यांना सूज येत असे आणि स्वतःला पुढे ढकलणं अशक्य होत होतं.
सायनाच्या कारकिर्दीवर रिओ ऑलिम्पिक 2016 दरम्यान झालेल्या गंभीर गुडघ्याच्या दुखापतीचा मोठा परिणाम झाला. तरीही तिने जिद्दीने पुनरागमन करत 2017 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकत आपली गुणवत्ता सिद्ध केली. मात्र वारंवार उद्भवणाऱ्या दुखापतींमुळे तिच्या कारकिर्दीची गती हळूहळू मंदावली. 2024 मध्ये सायनाने स्वतः जाहीर केलं होतं की आर्थरायटिसमुळे उच्चस्तरीय सराव करणे आता जवळपास अशक्य झाले आहे.






