भारतीय क्रिकेट संघ सोमवार, 22 जुलै रोजी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत भाग घेतील. त्याआधी बीसीसीआयनं आगामी टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या अंतरिम गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा केली.
वास्तविक, या पदासाठी गौतम गंभीरची पसंत असलेल्या मोर्ने मॉर्केलच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु श्रीलंका दौऱ्यावर तो भारतीय संघासोबत जाणार नाही. सध्या ही जबाबदारी साईराज बहुतुले यांच्याकडे देण्यात आली आहे. बहुतुले टीम इंडियाच्या नवीन कोचिंग स्टाफमध्ये सामील होणार आहेत.
भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सध्या मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सह अभिषेक नायर आणि रायन टेन डेस्कोट हे सहयोगी प्रशिक्षक आहेत. तर टी दिलीप हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. साईराज बहुतुले यांनी भारतीय संघासाठी 2 कसोटी आणि 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होते, जे आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत आहेत.
अभिषेक नायर आणि टी दिलीप 22 जुलै रोजी भारतीय संघासह श्रीलंकेला रवाना होतील, तर रायन टेन डेस्कोट देखील कोलंबोमध्ये थेट टीम इंडियामध्ये सामील होतील. ते सध्या लॉस एंजेलिस नाइट रायडर्सच्या कोचिंग स्टाफसोबत आहेत. मोर्ने मॉर्केलबद्दल बोलायचं झालं तर, बीसीसीआय आणि त्याच्यात चर्चा सुरू आहे. आता श्रीलंका दौऱ्यानंतर त्याच्याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाऊ शकतो.
टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध प्रथम 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 27 जुलैपासून होईल. त्यानंतर 28 जुलैला दुसरा आणि 30 जुलैला मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाईल. टी20 मालिकेनंतर 2 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना 2 ऑगस्ट रोजी आणि दुसरा सामना 4 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. त्यानंतर शेवटचा एकदिवसीय सामना 7 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिननं काढली आचरेकर सरांची आठवण, सोशल मीडियावर केली खास पोस्ट शेअर
‘या’ 5 दिग्गज खेळाडूंनी आपल्या देशासाठी कधीच नाही खेळला विश्वचषक…!
रोहितचं नाव होणार अजरामर, शतकांच्या विक्रमापासून केवळ दोन पावलं दूर ‘हिटमॅन’!