जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमुळे युवा खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी मंच मिळाला आहे. बऱ्याचशा युवा शिलेदारांनी आपल्या आयपीएलमधील प्रदर्शनाने संघ निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे आणि राष्ट्रीय संघात जागाही मिळवली आहे. युवा भारतीय वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्याबाबत पाकिस्तानचे माजी कर्णधार सलमान बट्ट यांचे असेच काहीसे म्हणणे आहे. उमरानच्या गोलंदाजीची गती पाहता तो लवकरच भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल, असे बट्ट यांना वाटते.
उमरानने आयपीएल २०२१ मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम केला होता. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघाकडून त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर पुढे तो केवळ २ सामन्यातच खेळताना दिसला. परंतु या पुरेशा संधीतच त्याने स्वत:ला सिद्ध करुन दाखवले. त्याने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यातच १५१.०३ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करत सर्वांचा चकित केले होते.
त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात त्याने १५३ किमी दर ताशीच्या वेगाने चेंडू टाकत आयपीएल २०२१ मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. त्याच्यातील याच कौशल्याने बट्ट यांना प्रभावित केले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना त्यांनी उमरानचे तोंडभरून कौतुक केले आहे.
ते म्हणाले की, “जर उमरान मलिकने भारत अ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शानदार प्रदर्शन केले. तर लवकरच त्याला भारतीय संघातही जागा मिळू शकते. त्याच्याकडे खूप गती आहे आणि भारतीय क्रिकेटमध्ये असे गोलंदाज फार क्वचितच पाहायला मिळतात. तो सलग १५० किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करू शकतो. जर त्याने आपल्या गोलंदाजीच्या याच गतीला कायम ठेवले तर तो त्याची स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण करेल. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे जर त्याचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील प्रदर्शन प्रशंसनीय राहिले तर निश्चितपणे त्याची राष्ट्रीय संघात निवड केली जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
जशास तसे! असे ३ प्रसंग, जेव्हा भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाच्या स्लेजिंगला दिलंय खणखणीत प्रत्युत्तर
द्रविड-रोहितने पुन्हा सुरू केली थांबलेली ‘ती’ प्रथा; गावसकर झाले खुश
क्रिकेट इतिहासातील ‘तीन दिग्गज’; ज्यांनी आपली कारकीर्द विनाकारण लांबवली