इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने नुकतेच विराट कोहली बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. वॉनने कोहली आणि केन विलियम्सनची तुलना करतांना कोहलीला केवल भारतीय असल्याने झुकत माप मिळत असल्याचा आरोप केला होता. त्याने अप्रत्यक्षपणे विलियम्सन सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सूचित केले होते.
मात्र त्याच्या या विधानावर सर्व स्तरातून टीका झाली होती. आता पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट्टने देखील वॉनवर निशाणा साधला आहे. वॉनचे विधान निरर्थक असल्याचे त्याने म्हंटले आहे.
“वॉनला वादग्रस्त विधाने करण्याची सवय”
वॉनने स्पार्क स्पोर्टशी बोलताना म्हंटले होते की, “केन विलियम्सन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला असता. मात्र, विराट कोहली भारतीय असल्याने त्याला असे म्हटले जाणार नाही. मला वाटते की केन विलियम्सन हा तिन्ही स्वरूपात सर्वोत्कृष्ट आहे. परंतु, विराट कोहलीसारखे १०० दशलक्ष इन्स्टाग्राम फॉलोअर्स नसल्याने तो मागे पडलेला दिसतो तसेच, केन क्रिकेटच्या पलीकडे दरवर्षी जाहिरातींमधून मोठा पैसा कमवत नाही.” पण आता सलमान बट्टने मायकेल वॉनच्या या विधानांना निरर्थक संबोधले आहे. तसेच वॉनला गरज नसतांना वादग्रस्त विधाने करून वाद निर्माण करण्याची सवय आहे, असेही म्हंटले आहे.
तो म्हणाला, “कोहली ज्या देशातून येतो त्यांची लोकसंख्या अधिक असल्याने त्याचे चाहते अधिक असणे, स्वाभाविक आहे. मात्र याशिवाय त्याची कामगिरी देखील उजवी आहे. कोहलीच्या नावे ७० आंतरराष्ट्रीय शतके आहेत. सध्याच्या काळातील कुठल्याच फलंदाजाच्या नावे ही कामगिरी नाही. त्याने जागतिक फलंदाजी क्रमवारीवर देखील दीर्घकाळ अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे मला या तुलना का केल्या जातात, ते कळत नाही.”
इतकेच बोलून बट्ट थांबला नाही, तर एकही वनडे शतक नावावर नसलेल्यांनी ७० आंतरराष्ट्रीय शतके ठोकणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलू नये, असाही टोला त्याने मायकेल वॉनला लगावला. “मायकेल वॉन हा एक चांगला कर्णधार होता. शिवाय कसोटी क्रिकेटमध्ये त्याने फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली. मात्र वनडे क्रिकेटमध्ये त्याला एकही शतक झळकावता आले नाही. विशेषतः सलामीवीर म्हणून येऊन देखील त्याला एकही शतक झळकावता आले नाही. त्यामुळे तुम्हाला या तुलना करायचा हक्क नाही. हे फक्त उगाच वादग्रस्त विधाने करून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत,” अशा स्पष्ट शब्दांत बट्ट याने वॉनला फटकारले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१: मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने मोडले सारे उच्चांक, वाचा सविस्तर
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
अखेर ‘ती’ एक ट्राॅफी जिंकल्यावर क्रिकेटजगताने इंग्लंडची थांबवली होती थट्टा मस्करी






