भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने गेली ५ वर्ष कसोटी क्रिकेटवर अधिराज्य गाजवले आहे. तसेच अनेकदा भारतीय संघ आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीतही पोहोचला आहे, परंतु भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यास अपयश आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सर्वच स्तरातून विराट कोहलीवर टीका केली जात आहे. अशातच माजी पाकिस्तानी कर्णधाराने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला आहे.
माजी पाकिस्तान कर्णधार सलमान बटने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “तुम्ही एक उत्कृष्ट कर्णधार असू शकता, परंतु जर तुम्ही जेतेपद पटकावले नसेल तर लोक तुम्हाला लक्षात ठेवणार नाही. असे होऊ शकते की,तुम्ही एक चांगले कर्णधार आहात. तुमच्या योजना खूप चांगल्या आहेत, परंतु तुमचे गोलंदाज त्याची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरत असतील. त्यामुळे नशिबाने ही साथ द्यायला हवी. जेतेपद पटकावणाऱ्या कर्णधाराला लोक नेहमी लक्षात ठेवतात.” (Salman butt wants Kohli to learn from kane Williamson)
तसेच तो पुढे म्हणाला की, “कधी कधी असेही होते की, तुम्ही एक महान कर्णधार नसता, तरी देखील तुमचा संघ चांगली कामगिरी करतो आणि तुम्ही जेतेपद जिंकता. परंतु ही एका कर्णधाराची परिभाषा नाही. लोकांसाठी तोच मोठा कर्णधार असतो जो मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवतो.”
तसेच पुढे त्याने विराट कोहलीची तुलना केन विलियमसन सोबत करत म्हटले की,”विराट कोहलीने कर्णधार शैलीचे मॉडेल बनायला हवे जसं की केन विलियमसनने केले आहे. विराट खूप उर्जा असणारा खेळाडू आहे. तो आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असतो. फक्त त्याने रागावर थोडे नियंत्रण करायला शिकायला हवं.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “विराट कोहलीला अजूनपर्यंत आयसीसीची ट्रॉफी आणि आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. तरी, तो एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, त्याची देहबोली उत्कृष्ट आहे आणि तो एक आक्रमक खेळाडू आहे. त्याची ऊर्जा पातळी वरच्या दर्जाची आहे. तो जेव्हा ही मैदानात उतरतो तेव्हा तो चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु कर्णधाराने रागावर नियंत्रण ठेवायला हवे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आयसीचीची स्पर्धा जिंकणाऱ्या कर्णधारांकडे कठीण क्षणी परिस्थिती कशी हाताळायची याची चांगलीच जाण होती. कोहलीकडे विविध प्रकारचे हावभाव होते.”
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! भारतीय महिला क्रिकेटपटू आढळली उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी
कसोटी क्रिकेटमध्ये विराट ऐवजी ‘हा’ खेळाडू आहे सरस कर्णधार, बदलू शकतो भारतीय संघाचे नशीब
ठरलं एकदाचे, टी २० विश्वचषक युएईत होणार! बीसीसीआय अध्यक्षांनी दिला दुजोरा






