चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये शनिवारी (२ ऑक्टोबर) अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालच्या विस्फोटक खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्स संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील पहिल्या डावात ऋतुराज गायकवाडने तुफानी शतक झळकावले; तर दुसऱ्या डावात चेन्नई सुपर किंग्स संघाची गोलंदाजी सुरू असताना असा काही मजेशीर प्रकार घडला जे पाहून, खेळाडूंसह समालोचकांनाही हसू आवरले नाही.
क्रिकेटमध्ये अनेकदा असे होत असते की, फलंदाज मोठा फटका खेळायचा नादात बॅट सोडून देतो. तर वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात गोलंदाजाचाही चेंडू हातातून सुटून जातो. असाच काहीसा प्रकार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला आहे.
तर झाले असे की, चेन्नई सुपर किंग्स संघाची गोलंदाजी सुरू असताना १७ वे षटक टाकण्यासाठी सॅम करन गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसरा चेंडू टाकत असताना सॅम करनच्या हातातून चेंडू निसटला आणि तो फलंदाजाकडे जाण्याऐवजी हवेत गेला. हे पाहून राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज ग्लेन फिलिप्स तो चेंडू मारण्यासाठी चेंडूच्या मागे धावला. चेंडू मारण्याच्या नादात तो खेळपट्टी पासून खूप दूर गेला होता.
परंतु तो चेंडू काही त्याच्या बॅटला लागला नाही. तो चेंडू शेवटी यष्टिरक्षक एमएस धोनीच्या हातात गेला होता. यानंतर पंचांनी त्याला नो चेंडू घोषित करून फ्री हिटचा इशारा दिला होता. फ्री हिट चेंडूचा फायदा घेत, ग्लेन फिलिप्सने जोरदार चौकार मारला होता. परंतु तत्पूर्वीच्या चेंडूवर फटका मारण्यासाठी फिलिप्सने केलेला प्रयत्न केलेला पाहून सामना दर्शकांमध्ये जोरदार हशा पिकला होता.
— No caption needed (@jabjabavas) October 2, 2021
राजस्थानचा ‘रॉयल’ विजय
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. तर रवींद्र जडेजाने नाबाद ३२ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटक अखेर ४ बाद १८९ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली होती. राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वालने तुफानी खेळी करत ५० धावांची खेळी केली. त्यानंतर शिवम दुबेने येऊन नाबाद ६४ धावांची खेळी करत राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना ७ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सविरुद्ध ऋतुची विशेष खेळी, सामन्यांनतर सांगितला धडाकेबाज शतकामागचा ‘राज’
विषय आहे का! आतापर्यंत आयपीएल २०२१मध्ये ४ फलंदाजांनी ठोकलंय शतक, त्यातील तिघे आहेत भारतीय
पावरप्लेमध्ये जयस्वालचा झंझावात, ताबडतोब अर्धशतक ठोकत रैना-राहुलसारखी कामगिरी करण्यात ‘यशस्वी’