सध्या इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून त्यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन्ही सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शानदार शतक झळकावले. विशेषतः गॉल येथे सध्या चालू असलेल्या सामन्यात इंग्लंडचा डाव संकटात असताना त्याने झुंजार खेळी करत संघाला सामन्यात पुनरागमन करू दिले. त्याची ही खेळी पाहून श्रीलंकेचा माजी महान यष्टीरक्षक-फलंदाज कुमार संगकारा देखील प्रभावित झाला आहे.
“या खेळीतून खूप काही शिकण्यासारखे”
रूटच्या या खेळीबद्दल बोलताना संगकारा म्हणाला, “लाजवाब खेळी! ज्या सहज पद्धतीने त्याने ही खेळी उभारली, त्याने सगळेच हैराण होते. आणि हे केवळ याच खेळीबाबत नव्हे तर पहिल्या कसोटीतील खेळीलाही लागू होते. बिनचूक योजना, त्याची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी, स्वीप-रिव्हर्स स्वीपचा योग्य वापर, स्ट्राईक रोटेट करत राहणे, तंत्र, आत्मविश्वास अशा सगळ्याच गोष्टी अविश्वसनीय होत्या. ही खेळी पाहून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.”
संगकाराला रूटच्या या खेळीतून काय शिकण्याजोगे आहे असे विचारले असता तो म्हणाला, “तुम्ही धावा काढू शकता, परंतु ज्या सहजतेने त्याने धावा काढल्या तशा पद्धतीने काढणे अवघड आहे. त्याने यासाठी बरीच मेहनत घेतल्याचे दिसून आले. त्याने परिस्थिती आणि खेळपट्टीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संपूर्ण खेळीत त्याचे नियंत्रण होते. माझ्या मते कुठल्याही फलंदाजासाठी किंवा प्रशिक्षकासाठी ज्या पद्धतीने रूट दिवसभर खेळपट्टीवर उभा राहिला, ते एक आदर्श उदाहरण आहे.”
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास पहिल्या डावातील श्रीलंकेच्या ३८१ धावांना प्रत्युतर देताना इंग्लंडचा संघ ३४४ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे श्रीलंकेला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळाली होती. परंतु इंग्लंडने दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेचा डाव १२६ धावांवर गुंडाळला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी चौथ्या डावात १६४ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने १ बाद ६२ धावांची मजल मारली होती.
महत्वाच्या बातम्या:
ती घटना घडली अन् बाऊंसरची भीती पळाली, शुबमन गिलने केला खुलासा
कर्णधार कोणीही असो, आमची इच्छा एकच, विराटच्या नेतृत्त्वाशी तुलना केल्याने रहाणेचे मोठे भाष्य
पंत आणि साहामध्ये यष्टीरक्षणासाठी टक्कर? वृद्धिमान साहा म्हणतो, शेवटचा निर्णय संघ