भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहली एकच सामना खेळून मायदेशी परतणार आहे. त्यामुळे आता कसोटी संघात चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आता भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनीहीही प्रतिक्रिया दिली आहे.
कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणेने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा सल्ला मांजरेकर यांनी दिला आहे.
विराट कोहलीने पालकत्व रजा घेतल्याने तो पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार आहे. त्याचप्रमाणे रोहित शर्माच्या फिटनेसबाबत अनिश्चितता असल्याने उर्वरित कसोटी सामन्यांत चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, हा प्रश्न आहे. मात्र अजिंक्य रहाणेची मागील ९ कसोटी सामन्यांतील सरासरी ५० हून अधिक असल्याचे सांगत त्यानेच जबाबदारी खांद्यावर घेत विराटच्या जागी फलंदाजी करावी, असे मत मांजरेकरांनी व्यक्त केले आहे.
कोहलीची उणीव प्रकर्षाने भासेल
“विराट कोहली परदेशातील कसोटी सामन्यांत भारतीय संघासाठी सगळ्यांत निर्णायक घटक आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चेतेश्वर पुजाराने चांगली कामगिरी केली असली, तरी भारतीय संघ परदेशात कोहलीवर अधिक विसंबून असतो. त्यामुळे येत्या कसोटी मालिकेत विराटच्या अनुपस्थितीत खेळणे, भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल”, असे संजय मांजरेकर यांनी म्हंटले आहे.
मात्र त्याचवेळी कसोटी सामन्यांतील आपली दुसरी फळी आजमावून पाहण्याची संधी भारताकडे असेही मांजरेकर म्हणाले. सलामीच्या स्थानांसाठी असलेल्या पर्यायांबाबत बोलतांना मांजरेकर म्हणाले,”पहिल्या दोन कसोटी सामन्यांत मयांक अगरवालसह पृथ्वी शॉला सलामीला संधी द्यावी, परंतु पृथ्वीचा आयपीएलचा खराब फॉर्म खंडित न झाल्यास त्याच्या जागी शुभमन गिलला संधी मिळावी. मधल्या फळीत अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असल्यास हनुमा विहारीने पाचव्या स्थानावर फलंदाजी करावी. शुभमन गिलला मधल्या फळीत खेळवले गेल्यास सहावा क्रमांक त्याच्यासाठी योग्य असेन.”
कसोटी मालिका चर्चेच्या केंद्रस्थानी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ वनडे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असला, तरी दोन्ही संघांचे आणि चाहत्यांचे कसोटी मालिकेच्या निकालाकडेच अधिक लक्ष असेल, असं निरीक्षण मांजरेकर यांनी मांडलं आहे.
मर्यादित षटकांच्या मालिका आधी खेळवण्यात येत असल्याने खेळाडूंना कसोटी मालिकेआधी लयीत येण्याची उत्तम संधी आहे. पूर्वी भारतीय संघ दौर्यावर असतांना सर्वप्रथम कसोटी मालिका खेळून नंतर मर्यादित षटकांचे सामने खेळत असे. मात्र कसोटी मालिकांचे निकाल दीर्घकाळ स्मरणात राहत असल्याने खेळाडूंना तयारीसाठी पुरेसा सराव आवश्यक असतो. तो सराव वनडे आणि टी-२० मालिकेतून यंदा मिळणार असल्याने मांजरेकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
भारतीय संघ कसोटी मालिकेची तयारी म्हणून मर्यादित षटकांच्या सामन्यांत महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. तसेच स्टार फलंदाज रोहित शर्माची जागा भारतीय संघात कोणीही घेऊ शकत नसले, तरी त्याच्या अनुपस्थितीत इतर युवा खेळाडू दमदार कामगिरी करून आपली जागा पक्की करतील, असा विश्वासही मांजरेकर यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचे वनडे मालिका विजयाचे स्वप्न भंगणार! या कारणामुळे दुसरा वनडे सामना होणार रद्द?
“पाकिस्तान संघ कोणता क्लब संघ नाही” शोएब अख्तर न्यूझीलंडवर कडाडला
समालोचन करताना गिलख्रिस्टकडून भारतीय खेळाडूबाबात मोठी चूक, चाहत्यांच्या रोषानंतर मागितली माफी
ट्रेंडिंग लेख –
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके
आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’