मंगळवारी (५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१(आयपीएल) हंगामातील ५१ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने ८ गड्यांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपल्यात जमा झाले आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन निराश दिसला. पराभवानंतर त्याने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
नाराज दिसला संजू
मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना संजू म्हणाला,
“ही खेळपट्टी नक्कीच आव्हानात्मक होती. अबुधाबीवरून व शारजाला येणे तितकेसे परवडले नाही. या खेळपट्टीवर सुरुवातीलाच चेंडू बॅटवर येत नव्हता. माझ्यामते अबुधाबीची खेळपट्टी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळपट्टी होती. तुम्ही फलंदाजांना या खेळपट्टीवर दोष देऊ शकत नाही.”
संजू मुंबईच्या फलंदाजांचे कौतुक करताना म्हणाला,
“आम्हाला माहित होते की, ते आक्रमक पवित्रा घेणार आहेत. कारण, पावर प्लेमध्ये रनरेट वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार होते. दुसऱ्या डावात खेळपट्टी काहीशी फलंदाजीला मदत करत होती. तरीही, तुम्ही मुंबईच्या फलंदाजांकडून श्रेय घेऊ शकत नाही.”
या पराभवामुळे राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. कारण, त्यांचा रनरेट खूपच खाली घसरला असून त्यांना अखेरच्या सामन्यात १५० पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवावा लागेल. राजस्थानचा अखेरचा सामना ७ ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होईल.
राजस्थानची उत्तरार्धात संमिश्र कामगिरी
राजस्थानने आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धात आत्तापर्यंत ६ सामने खेळले असून त्यापैकी, केवळ दोन सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. पंजाब किंग्सला अखेरच्या चेंडूवर मात देत त्यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर आरसीबी, दिल्ली व हैदराबाद यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. चेन्नई विरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता मुंबईने त्यांना पराभूत करत अडचणीत आणले आहे.