यष्टीरक्षक संजू सॅमसननं दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील 11वं शतक ठोकून पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघासाठी दावा ठोकला. सॅमसननं दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया डी संघासाठी खेळताना शतक ठोकलं. यासह तो केरळच्या खेळाडूंद्वारे सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. याबाबतीत सचिन बेबी (18 शतकं) आणि रोहन प्रेम (13 शतकं) त्याच्या पुढे आहेत.
संजू सॅमसननं अवघ्या 95 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. त्यानं आपल्या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकार लगावले. याच सामन्यात इंडिया डी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला होता. मात्र सॅमसननं मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत इंडिया बी संघाच्या गोलंदाजांची भरपूर धुलाई केली. तो 106 धावा करून बाद झाला. नवदीप सैनीनं त्याला नितीश कुमार रेड्डीच्या हाती झेलबाद केलं.
विशेष म्हणजे, संजू सॅमसनची दुलीप ट्रॉफीमध्ये निवड झाली नव्हती. तो ईशान किशनचा पर्याय म्हणून आला होता. मात्र आता त्यानं शतक ठोकून भारताच्या कसोटी संघासाठी दावा ठोकला आहे. सध्या टीम इंडियात यष्टीरक्षक म्हणून जागा मिळवण्यासाठी रिषभ पंत, केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि ईशान किशन सारखे खेळाडू शर्यतीत आहेत. अशा परिस्थितीत संजूला स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल.
संजू सॅमसनच्या फर्स्ट क्लास करिअरवर नजर टाकली तर, त्यानं 3,700 पेक्षा अधिक धावा केल्या, ज्यात 11 शतकं आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. संजूला श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत संधी मिळाली होती. मात्र मालिकेतील दोन्ही सामन्यांत तो शून्यावर बाद झाला होता. आता त्यानं दुलीप ट्रॉफीत शतक ठोकून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा –
ind vs ban; 376 धावांत भारतीय संघ आटोपला, दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या खात्यात केवळ 37 धावा
10 चौकार, 3 षटकार… दुलीप ट्रॉफीत संजू सॅमसनचा रुद्रावतार; केली इतक्या धावांची खेळी
आर अश्विनचा विश्वविक्रम! 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू