भारतीय संघाचा श्रीलंका दौरा नुकताच संपला. या दौऱ्यात भारताने श्रीलंकेसोबत 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली. ज्यामध्ये भारताने टी20 मालिका 3-0 ने जिंकली आणि यजमान श्रीलंकेनं एकदिवसीय मालिका 2-0 ने जिंकली. तत्पूर्वी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनकडे (Sanju Samson) दुर्लक्ष करण्यात आले. कारण त्याला भारतीय एकदिवसीय संघात स्थान दिलं नाही. संजूने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीवर शानदार शतक देखील झळकावले होते.
संजू सॅमसननं (Sanju Samson) एकदिवसीय संघात निवड न झाल्याच्या स्थितीबाबत मौन सोडलं आहे आणि मोठं वक्तव्य केलं आहे. केसीएलच्या पत्रकार परिषदेत सॅमसनला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुर्लक्षित केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना सॅमसन म्हणाला, “जेव्हाही निवडकर्ते माझी निवड करतील तेव्हा मी खेळायला जाईन. फक्त तेच आहे. शेवटी आमची टीम चांगली कामगिरी करत आहे. मी उच्च उद्देशावर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी मी सकारात्मकपणे घेण्याचा प्रयत्न करतो.”
भारतीय संघाच्या टी20 विश्वचषक विजयावर बोलताना सॅमसन म्हणाला की, “गेले 3-4 महिने माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम राहिले आहेत. विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. हे मला 3-4 वर्षांपूर्वी हवे होते. शेवटचा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची माझी इच्छा होती. मात्र, संघात आल्यानंतर आणि टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर मला जाणवले की हे सोपे काम नाही.”
संजू सॅमसनचं (Sanju Samson) वय सध्या 29 वर्ष 274 दिवस आहे. संजूनं भारतासाठी 16 एकदिवसीय आणि 30 टी20 आंतरराष्ठ्रीय सामने खेळले आहेत. 16 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 56.66च्या सरासरीनं फलंदाजी करताना 510 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 99.60 राहिला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 3 अर्धशतक आणि 1 शतक आहे, तर सर्वोच्च धावसंख्या 108 आहे. 30 टी20 सामन्यांमध्ये सॅमसनच्या नावावर 444 धावा आहेत. यादरम्यान त्यानं 2 अर्धशतक झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
विनेश फोगट प्रकरणी निकाल यायला विलंब का? निर्णय 13 ऑगस्टपर्यंत पुढे का ढकलण्यात आला?
“मी कोहलीला पाठीशी घालत नाही पण…” श्रीलंकेविरुद्ध गमावलेल्या मालिकेनंतर कार्तिकचा मोठा दावा
227 दिवसांनी अनुभवी फलंदाज मैदानात; पहिल्याच सामन्यात मोठी खेळी, टी20 संघात मिळणार का स्थान?