---Advertisement---

पाकिस्तानला मिळाले हे दोन नवीन कर्णधार, सर्फराज अहमदची झाली हकालपट्टी

On: शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2019 5:46 PM
---Advertisement---

या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 3 टी20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्याआधी आज(18 ऑक्टोबर) पाकिस्ताने यष्टीरक्षक फलंदाज सर्फराज अहमदला कर्णधारपदावरुन काढून टाकले असून त्याच्याऐवजी कसोटी आणि टी20 संघासाठी दोन नवीन कर्णधारांची नावे जाहिर केली आहेत.

पुढील 2019-20 या मोसमात पाकिस्तानचे कसोटी क्रिकेटमध्ये अझर अली नेतृत्व करणार आहे. तर पुढीलवर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकापर्यंत बाबर आझर पाकिस्तानच्या टी20 संघाचा कर्णधार असणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून हे दोघे पाकिस्तानचे नेतृत्व करताना दिसणार आहेत.

तसेच पाकिस्तानने सर्फराज अहमदला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याबरोबरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी आणि टी20च्या संघातूनही वगळले आहे.

पाकिस्तानच्या कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर अझर म्हणाला, ‘पाकिस्तानचे नेतृत्व करायला मिळणे हा मोठा सन्मान आहे. मी संघाच्या मदतीने माझ्यावर कसोटी चॅम्पियनशिपसाठी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करेल.’

‘सर्फराज अहमदने खूप चांगले काम केले आहे. त्याने कच्च्या प्रतिभेच्या खेळाडूंचे अनुभवी खेळाडूंमध्ये रूपांतर केले आहे आणि मी आता त्या खेळाडूंना घेऊन कसोटी चॅम्पियनशिपसाठी आमची उद्दिष्टे एकत्रितपणे साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

तसेच टी20 मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बाबर आझम म्हणाला, ‘मला टी20  क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या संघाचे कर्णधारपद मिळणे ही माझ्या कारकिर्दीत घडलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी गोष्ट आहे. मी या आव्हानासाठी तयार असून या प्रक्रियेमध्ये आणखी शिकेल. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आनंदी आहे.’

त्याचबरोबर कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर सर्फराज म्हणाला, ‘पाकिस्तान संघाचे उच्च स्तरावर नेतृत्व करायला मिळणे ही सन्मानाची गोष्ट होती. मी माझ्या संघसहकाऱ्यांना, प्रशिक्षकांना आणि निवड समीतीला धन्यवाद म्हणतो, ज्यांनी माझ्या या प्रवासात माझी मदत केली.

तसेच पाकिस्तानचे 100 आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व केलेला सर्फराज पुढे म्हणाला, ‘मी अझर अली, बाबर आझमला आणि पाकिस्तान क्रिकेट संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.’

सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तसेच टी20 क्रमवारीत पाकिस्तान अव्वल क्रमांकावर आला होता.

पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी20 मालिकेला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---