इराणी चषक स्पर्धेत ‘रेस्ट ऑफ इंडिया’ विरुद्ध मुंबईचा संघ मजबूत स्थितीत आहे. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी (2 ऑक्टोबर) सरफराज खानची शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बेंचवर बसलेल्या या 26 वर्षीय खेळाडूनं शतक झळकावून प्रत्युत्तर दिलं.
सरफराज खाननं या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतासाठी शानदार पदार्पण केलं होतं. मात्र बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली, केएल राहुल आणि रिषभ पंत यांच्या पुनरागमनामुळे त्याला बेंचवर बसावं लागलं. मुंबईचा संघ 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी ट्रॉफीमध्ये खेळणार होता. त्याच्या एक दिवस आधी त्याला भारतीय संघातून सोडण्यात आलं होतं.
सरफराजनं ‘रेस्ट ऑफ इंडिया’ विरुद्ध 150 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 15वं शतक आहे. इराणी चषकातील सरफराजचं हे दुसरं शतक आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत मुंबईनं 94 षटकांत 6 गडी गमावून 338 धावा केल्या. सध्या सरफराज खान 103 धावा करून क्रीजवर आहे, तर तनुष कोटियन 26 धावांवर खेळत आहे. पृथ्वी शॉनं 4, आयुष म्हात्रेनं 19, हार्दिक तमोरे 0, अजिंक्य रहाणे 97, श्रेयस अय्यर 57 आणि शम्स मुलानी 5 धावा करून बाद झाले.
सरफराज खाननं यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. त्यानं भारतासाठी आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 50 च्या सरासरीनं एकूण 200 धावा केल्या. कसोटीच्या 5 डावांमध्ये त्यानं 3 अर्धशतकं ठोकली आहेत. 68 हा त्याचा सर्वोच्च स्कोर राहिला.
हेही वाचा –
शतक थोडक्यात हुकलं, पण संघासाठी संकटमोचक बनून आला अजिंक्य रहाणे!
हत्येचा गुन्हा असलेला शाकिब बांगलादेशात परतणार नाही? या देशात स्थायिक होण्याची शक्यता
टीम इंडियाला धक्का! पुनरागमन करण्यापूर्वी स्टार खेळाडू पुन्हा जखमी