भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयनं मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली.
या सामन्यासाठी भारतीय खेळाडू सध्या चेन्नईत तळ ठोकून तयारी करतायेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी सरफराज खानलाही टीम इंडियात स्थान मिळालं, मात्र मालिका सुरू होण्यापूर्वी त्याचा खराब फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. मधल्या फळीतील हा उजव्या हाताचा फलंदाज सध्या दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत खेळतोय. तर भारतीय संघातील बाकीचे खेळाडू चेन्नईच्या कॅम्पमध्ये सामील झाले आहेत.
वास्तविक, आतंरराष्ट्रीय कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सरफराजला आपली गेलेली लय परत मिळवायची आहे. मात्र यात तो सातत्यानं अपयशी ठरतोय. दुलीप ट्रॉफीमध्ये सरफराज इंडिया बी संघाकडून खेळतो. पहिल्या सामन्याच्या दोन डावांत त्याला केवळ 55 धावा करता आल्या.
आता दुसऱ्या सामन्यात हा स्फोटक फलंदाज नक्कीच चमत्कार घडवेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. परंतु त्यानं पुन्हा एकदा सर्वांना निराश केलं. इंडिया बी संघाच्या पहिल्या डावात तो केवळ 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अंशुल कंबोजनं त्याला एलबीडब्ल्यू बाद केलं. सरफराजचा हा फॉर्म पाहून चाहत्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की, त्याला भारतीय संघात स्थान देऊन निवड समितीनं चूक केली का?
सरफराज खाननं फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. भारतीय संघाची कसोटी कॅप मिळवण्यासाठी त्यानं खूप संघर्ष केला. मात्र बोर्डानं दाखविलेल्या विश्वासावर तो पूर्णपणे खरा उतरला. त्यानं तीन सामन्यांत 50 च्या सरासरीनं 200 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतकी खेळीही निघाल्या. कदाचित ही कामगिरी लक्षात घेऊन बीसीसीआयनं आगामी कसोटी मालिकेसाठी सरफराजची संघात निवड केली. मात्र दुलीप ट्रॉफीतील सध्याचा फॉर्म पाहता, त्याला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणं मुश्कील आहे.
हेही वाचा –
दणका! 17 षटकार 5 चाैकार, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाची झंझावाती शतकी खेळी
टीम इंडियाला मिळाला रोहितचा बॅकअप ओपनर, दुलीप ट्रॉफीत ठोकलं शानदार शतक!
कपिल शर्माच्या शोमध्ये रोहितसह दिसणार भारताचे हे वर्ल्डकप विजेते स्टार्स! प्रोमो व्हिडिओ लॉन्च