महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी (10 जून) दिवसातील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात सातारा वॉरियर्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स हे संघ समोरासमोर आले होते. आतापर्यंत स्पर्धेत एकही विजय न मिळवलेल्या सातारा वॉरियर्सने अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवत आपल्या गुणांचे खाते खोलले.
पहिल्या सामन्यातील विजयानंतर पराभव पत्करलेल्या कोल्हापूर टस्कर्सने या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिले दोन गडी 32 धावांमध्ये बाद करत त्यांनी चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर कर्णधार सौरभ नवले व ओम भोसले यांनी 80 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. युवा ओम याने 37 चेंडूंमध्ये तीन चौकार व चार षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. संघ मजबूत स्थितीत असताना 20 धावांमध्ये चार फलंदाज बाद झाले. कर्णधार सौरभ याच्या साथीला आलेल्या शमशुझमा काझी याने अखेरपर्यंत कर्णधारासोबत किल्ला लढवत 21 चेंडूंमध्ये 45 धावांची भागीदारी रचली. सौरभ याने 47 चेंडूंमध्ये 72 तर काझी याने 12 चेंडूमध्ये 24 धावा केल्या. कोल्हापूरसाठी अथर्व डाकवे याने दोन बळी मिळवले.
दुसऱ्या विजयाच्या शोधात असलेल्या कोल्हापूर संघाची सुरुवात तितकी चांगली झाली नाही. कर्णधार राहुल त्रिपाठी, अनुभवी अंकित बावणे व सचिन धस केवळ 38 धावांमध्ये माघारी परतले. त्यानंतर अष्टपैलू श्रीकांत मुंढे व सिद्धार्थ म्हात्रे यांनी डाव सावरला. त्यांनी चौथ्या गड्यासाठी 72 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सिद्धार्थ 28 धावा करून माघारी परतला. एका बाजूने श्रीकांत मुंढे याने आक्रमक फलंदाजी करत 41 चेंडूंमध्ये 64 धावा कुटल्या. अखेरच्या दोन षटकात केवळ 25 धावा आवश्यक असताना राजवर्धन हंगरगेकर व वैभव दरकुंडे यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. वैभव याने शेवटच्या षटकात केवळ चार धावा देत संघाला सात भावांनी विजय मिळवून दिला. कर्णधार सौरभ नवले सामनावीर ठरला.






