---Advertisement---

आयपीएल भारतात आयोजित करण्याचा बीसीसीआयचा निर्णय चुकला का? गांगुलीने दिले उत्तर

On: गुरूवार, मे 6, 2021 1:47 PM
Sourav Ganguly
---Advertisement---

यंदाचा आयपीएल हंगाम भारतात खेळवण्यात आला होता. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात वाढत असतांना देखील ही स्पर्धा खेळवण्यात येत असल्याने टीका होत होती. त्यातच काही दिवसांपूर्वी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयला शेवटी आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
या निर्णयानंतर आता आयपीएल भारतात आयोजित करण्याचा निर्णयच चुकला होता, अशी चर्चा रंगते आहे. तसेच बायो बबल मध्ये आयपीएल खेळवले जात असतांना त्यात कोरोनाचा शिरकाव झालाच कसा, असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने या सगळया प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

“नियोजन केले त्यावेळी भारतातील परिस्थिती फारशी वाईट नव्हती”
भारतात आयपीएलचे आयोजन करण्याचा निर्णय चुकला नाही, असे गांगुलीने स्पष्ट केले. ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे भाष्य केले. गांगुली म्हणाला, “ज्यावेळी आम्ही भारतात आयपीएलचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी परिस्थिती फारशी गंभीर नव्हती. रुग्णसंख्या कमी होती. आम्ही इंग्लंडच्या दौऱ्याचे देखील यशस्वीपणे आयोजन केले होते. त्यामुळे युएई मध्ये आयोजन करण्याबाबत देखील विचार झाला होता पण फेब्रुवारीत भारतात रूग्णसंख्या कमी असल्याने भारतातच आयोजन करण्याचे निश्चित केले.”

बायो बबल मध्ये असतांना देखील कोरोनाची खेळाडूंना लागण कशी झाली, असा प्रश्नही गांगुलीला यावेळी विचारला गेला. कुठल्या व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे हे घडले का असे विचारले असता गांगुली म्हणाला, “मला नाही वाटत की असे काही झाले असेल. आमच्याकडे जो रिपोर्ट आला आहे, त्यात बायो बबलचे उल्लंघन केल्याबाबत काही उल्लेख नाही. त्यामुळे हे कसे झाले, ते नेमके सांगणे कठीण आहे. देशात देखील इतके संक्रमण कसे पसरले आहे, हे सांगणे खरंच कठीण आहे.”

भारतीय संघ आता या महिन्याच्या अखेरीस इंग्लंड दौर्‍यावर जाईल. १८ ते २२ दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेआधी खेळाडूंचे लसीकरण केले जाईल का, असाही प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला. त्यावर त्याने खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. त्यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवर लस घेऊन घ्यावी, असे आवाहन केले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---