शारजाह। अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड संघात सोमवारी(२५ ऑक्टोबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील १७ वा सामना पार पडला. शाहजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, या सामन्यादरम्यान स्कॉटलंडच्या नावे एक नकोसा विक्रम झाला आहे.
या सामन्यात अफगाणिस्तानने स्कॉटलंडसमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १०.२ षटकांत ६० धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही चौथ्या क्रमांकाची निचांकी धावसंख्या ठरली आहे.
टी२० विश्वचषकातील सर्वात निचांकी धावसंख्येच्या विक्रमाच्या यादीत पहिल्या दोन क्रमांकावर नेदरलँड्सचा संघ आहे. २०१४ सालच्या टी२० विश्वचषकात नेदरलँड्स ३९ धावांत श्रीलंकेविरुद्ध गारद झाले होते. तर, यंदाच्या म्हणजेच २०२१ सालच्या टी२० विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच नेदरलँड्सचा डाव ४४ धावांमध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर या यादीत तिसरा क्रमांकावर वेस्ट इंडिज असून त्यांनीही यंदाच्या स्पर्धेतच इंग्लंडविरुद्ध ५५ धावांवर सर्वबाद होत नकोसा विक्रम आपल्या नावे केला.
या यादीत चौथ्या क्रमांकावर स्कॉटलंडसह संयुक्तरित्या न्यूझीलंड देखील आहे. न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्ध २०१४ सालच्या टी२० विश्वचषकात ६० धावांवर गारद झाले होते. विषेश म्हणजे या यादीतील पहिल्या ५ पैकी ३ धावसंख्या या २०२१ च्या टी२० विश्वचषकात नोंदवल्या गेल्या आहेत.
टी२०मधील स्कॉटलंडची निचांकी धावसंख्या
याशिवाय स्कॉटलंडने आणखी एक नकोसा विक्रम केला आहे. ६० धावा ही स्कॉटलंडची आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २००९ साली स्कॉटलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द ओव्हल येथे ८१ धावा केल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत स्कॉटलंडचा डाव ८० धावांच्या आत संपला नव्हता. मात्र, सोमवारी अखेर स्कॉटलंडवर ही नामुष्की ओढावली.
आंतरराष्ट्रीय टी२०मधील स्कॉटलंडची निचांकी धावसंख्या –
६० – विरुद्ध अफगाणिस्तान, शाहजाह, २०२१
८१ – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, द ओव्हल, २००९
८२ – विरुद्ध पाकिस्तान, एडिनबर्ग, २०१८
९१ – विरुद्ध केनिया, दुबई, २०१३
९९ – विरुद्ध आयर्लंड, दुबई, २०१०
महत्त्वाच्या बातम्या –
कडक ना भावा! हवेत झेपावत अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद शहजादने घेतला अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ
शमीवर अनावश्यक टीका, राहुल गांधींनाही राहवेना; ट्विट करून साधला निशाणा