मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला. तसेच क्रिकेटचे सर्व सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत कोणतीच स्पर्धा पार पडली नाही. सर्वच खेळाडू क्रिकेट पुन्हा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, रणजी क्रिकेटमधला दादा मानला जाणारा भारताचा माजी सलामीचा फलंदाज वसिम जाफर याने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काही स्थानिक स्पर्धा रद्द करण्याचे मत व्यक्त केले आहे.
वसीम जाफर म्हणाला, “विजय हजारे, दुलीप ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफी रद्द करण्यात करावे आणि त्याऐवजी त्यावेळचा उपयोग रणजी चषक आणि सय्यद मुस्ताक अली टी 20 चे आयोजन करावे. सर्वच स्पर्धा घेण्याची घाई करू नये. खेळाडूंना आराम करण्यासाठी वेळ मिळेल.”
ऑगस्ट महिन्यामध्ये भारतातील स्थानिक क्रिकेट मौसमाला सुरुवात होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. जाफर म्हणाला, “जेव्हाही क्रिकेट सुरू होईल तेव्हा सर्वप्रथम आयपीएलच्या नियोजनावर बीसीसीआयचा भर असेल.”
“बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे नियोजन करण्याच्या तयारीत आहे, पण आशिया चषक आणि टी 20 विश्वचषकाच्या भवितव्यावर आयपीएलचे नियोजन होणार आहे. आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआयने इराणी चषकाचे आयोजन करावे. कारण सौराष्ट्रने पहिल्यांदा हे चषक जिंकले होते. त्यांना ही स्पर्धा खेळण्याचा पूर्ण हक्क आहे.”
तो म्हणाला, “त्यानंतर रणजी चषकाला आपण सुरुवात करू शकतो. पुढील वर्षी आयपीएल लिलावाच्या अगोदर बीसीसीयने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे आयोजन करायला हवे. बीसीसीआयने विजय हजारे, दुलीप ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफी या स्पर्धा रद्द कराव्या आणि त्यांच्या ऐवजी रणजी आणि आयपीएल या दोन स्पर्धांवर भरण्यावर लक्ष केंद्रित करावे. यामुळे खेळाडूंना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो, असेही त्याने नमूद केले.”
रणजी चषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या हा खेळाडू म्हणाला की, “विजय हजारे आणि दुलीप ट्रॉफीमध्ये मिळालेल्या दोन महिन्यांचा वेळ खेळाडूंनी आराम करण्यासाठी करावा. ज्युनिअर स्तरावर देखील अशा पद्धतीचे नियोजन करायला हवे. यंदाच्या मौसमात 23 आणि 19 वर्षांखालील वनडे स्पर्धा रद्द केल्या पाहिजेत.”
जाफरने सुमारे दोन दशके क्रिकेटमध्ये योगदान देऊन त्याने मार्च 2020 मध्ये वयाच्या 42 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्ती घेतली. प्रथम श्रेणीचे तब्बल 260 सामने खेळत जाफरने 19 हजार 410 धावा केल्या आहेत. यामध्ये 57 शतके आणि 91 अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 150 रणजी सामने खेळणारा वसीम जाफर हा पहिला खेळाडू आहे आणि त्याच्या नावे 12 हजारांपेक्षा अधिक धावा करण्याचा भारतातील विक्रम आहे.