गुणतालिकेत तळाशी असलेला सनरायझर्स हैदराबाद संघ दमदार पुनरागमन करण्यासाठी झगडताना दिसत आहे. यासाठी संघ व्यवस्थापनाने कठोर निर्णय घेतल्याचेही दिसून येत आहे. रविवारी (०२ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२१ चा २८ वा सामना पार पडला.
दिल्ली येथे झालेल्या या सामन्यापुर्वी हैदराबाद संघाने डेविड वॉर्नरला नेतृत्त्वपदावरुन हटवत केन विलियम्सनच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सुत्रे सोपवली होती. यानंतर वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधूनही डच्चू देण्याचा अनपेक्षित निर्णय त्यांनी घेतला. यावर दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने नाराजी व्यक्त केली आहे.
वॉर्नरची आयपीएलमधील फलंदाजी आकडेवारी अतिशय प्रशंसनीय आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज आहे. याबरोबरच या लीगमध्ये ५० वेळा अर्धशतक झळकावणारा आणि ३ वेळा ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्याला दिली जाते) जिंकणारा तो एकमेव फलंदाज आहे. या हंगामातही ६ सामने खेळताना त्याने १९३ धावा चोपल्या आहेत. तरीही त्याला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर केल्याचा निर्णय अतिशय विचित्र वाटल्याचे स्टेनने सांगितले आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना स्टेन म्हणाला की, “तो अंतिम एकादशचा भाग नव्हता हे पाहून जरा विचित्र वाटले. मी समजू शकतो, हैदराबाद संघाला पुढील हंगामात केन विलियम्सनला संघनायक बनवायचे असेल, त्यामुळे त्यांनी यावर्षीच त्याची कर्णधारपदी नियुक्ती केली असावी. पण वॉर्नर हा एक अद्भुत फलंदाज आहे आणि मी त्याला नक्कीच प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली असती. मला तर असे वाटत आहे की, वॉर्नरला हैदराबादकडून खेळताना पाहण्याची ही शेवटची वेळ असेल.”
हैदराबाद संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स टॉम मूडी यांनी सामन्यापुर्वीच कल्पना दिली होती की, संघबांधणी सुरळित करण्यासाठी वॉर्नरला संघाबाहेर केले जाऊ शकते. परंतु त्यांच्या पहिल्या सामन्यानंतर कर्णधार असताना वॉर्नरने मनिष पांडेला पुढील सामन्यात वगळण्याचे ठरवले होते. त्यामुळे कदाचित हैदराबाद संघाने असा निर्णय घेतला असल्याचे स्टेनला वाटत आहे.
“मला नक्की माहिती नाही. पण कदाचित काही निर्णयांमुळे वॉर्नरच्या नेतृत्त्व शैलीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले असावे. कदाचित मनिष पांडेला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णयावर संघ व्यवस्थापन नाराज असेल. परंतु एक कर्णधार त्याच्या संघाबाबत त्याच्या मनानुसार निर्णय घेऊ शकतो. मला तर असे वाट आहे की, बंद दाराआड हैदराबादच्या संघात काहीतरी घडत आहे, ज्याची कल्पना आपल्यापैकी कोणालाही नाही,” असे स्टेनने पुढे म्हटले आहे.