भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या हटके लेखन शैलीमुळे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. नेहमी ट्विटरवरती एक्टिव्ह असणाऱ्या सेहवागच्या पोस्ट्स चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतात.
मंगळवारी (4 फेब्रुवारी ) दक्षिण आफ्रिका येथे 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेनाने अनुक्रमे शतकी व अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हा सामना भारतीय संघाने 10 विकेट्सने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
त्यानंतर पाकिस्तान संघाची खिल्ली उडवत सेहवागने एक मजेशीर ट्विट केला आहे. ज्यावर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
“अब तो आदत सी है !” असे ट्विट सेहवागने केले आहे. त्याचबरोबर या ट्विटसह त्याने यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेनाचा फोटोदेखील शेअर केला आहे.
https://twitter.com/virendersehwag/status/1224697991271014401
आत्तापर्यंत 19 वर्षांखालील विश्वचषकात भारत-पाकिस्तान 10 वेळा आमने-सामने आले आहेत. यातील 5 सामने भारताने जिंकले आहेत. तर 5 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
आता दक्षिण आफ्रिकेत सध्या सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात 6 फेब्रुवारीला 19 वर्षांखालील न्यूझीलंड विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल त्या संघाविरुद्ध भारतीय संघ 9 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळेल.






