---Advertisement---

रणजी ट्रॉफीसाठी खेळाडूंचं सिलेक्शन होतं तरी कसं, काय खटाटोप करावा लागतो? जाणून घ्या एका क्लिकवर

On: मंगळवार, जून 14, 2022 11:26 PM
Sarfaraz-Khan-And-Yuvraj-Singh
---Advertisement---

भारतीय क्रिकेटचे पितामह म्हटल्या गेलेल्या रणजीत सिंहजी, यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९३२ मध्ये रणजी ट्रॉफीला सुरुवात झाली. २०१९ पर्यंत दरवर्षी अव्याहतपणे रणजी ट्रॉफी खेळली गेली. त्यानंतर दोन वर्ष कोरोनाच संकट जगावर आलं आणि इतिहासात पहिल्यांदाच ही स्पर्धा रद्द केली गेली. यादरम्यान वनडे आणि टी२० च्या स्पर्धा खेळल्या गेल्या. मात्र, खेळाडू आणि चाहत्यांना रणजी ट्रॉफीचीच ओढ लागली होती. अखेर दोन वर्षाच्या अवकाशानंतर रणजी ट्रॉफी खेळली गेली.

देशातील या मानाच्या स्पर्धेत खेळण्याचे सर्वच युवा क्रिकेटपटूंचे ध्येय असते. आज आयपीएलचा कितीही झगमगाट असला तरी, रणजी ट्रॉफी हेच खरे क्रिकेट म्हणत, अनेकांना त्याची ओढ लागलेली आहे. आपल्या राज्यासाठी रणजी खेळून देशाच्या संघाची जर्सी अंगावर चढवण्याचे स्वप्न सारे बघतात. अगदी लहान वयात सुरू झालेला हा प्रवास, काहींचा पूर्ण होतो तर काहींचा अधुराच राहतो. रणजी ट्रॉफी खेळणे हे सौभाग्य वाटत असलं तरी, हे सौभाग्य देखील प्राप्त करून घेणे मोठी गोष्ट आहे. मात्र, इथपर्यंतचा प्रवास कसा करावा? हा देखील प्रश्न अनेकांपुढे असतो. आज याच प्रश्नाचे उत्तर आपण खोलात जाऊन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हालाही क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल तर, हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

रणजी ट्रॉफी कशी खेळायची? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उदाहरण घेऊया. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजे देशातील प्रमुख संघांपैकी एक संघ. महाराष्ट्रात एकूण तीन क्रिकेट संघटना आहेत. मुंबई आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन यांचे वेगवेगळे संघ डोमेस्टिक क्रिकेट खेळतात. उत्तरेला नंदुरबार, दक्षिणेला सिंधुदुर्ग आणि पूर्वेला हिंगोलीपर्यंत अशा २१ जिल्हा संघटना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहेत. म्हणजेच या तीन संघटनांपैकी सर्वात जास्त व्याप्ती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची दिसून येते.

हेही पाहा- रणजी ट्रॉफी खेळायचीय मग हा व्हिडीओ पाहाच

सुरुवातीच्या काळात एमसीएवर बहुतांशी वर्चस्व होते पुण्याचे.‌ जास्त करून पुणे व आसपासच्या खेळाडूंना महाराष्ट्र संघात संधी मिळायची. मात्र, मागील दोन-तीन दशकात परिस्थिती पूर्णपणे बदलली. अगदी ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळू लागली. एमसीएने आपले स्ट्रक्चर बदलल्याचा हा फायदा होता. तसेच, रणजी ट्रॉफी आणि महाराष्ट्र क्रिकेट संघासाठीच्या निवड प्रक्रियेतही बदल करण्यात आले.

आजही एमसीएचे संचालन हे पुण्यातूनच होते. एमसीए अगदी वयोगट क्रिकेटपासून खेळाडू शोधण्यावर भर देत असते. १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील, १९ वर्षाखालील व २३ वर्षाखालील मुलांचे महाराष्ट्राचे संघ आहेत. तसेच, या सर्वातून निवडलेल्या काहींची सीनियर संघात निवड होते. मात्र, महाराष्ट्रासाठी खेळायचे कसे त्याचे उत्तर आणखी बरेच लांबलचक आहे.

सर्वप्रथम ज्या वेळी तुम्ही क्रिकेटर होण्याचा विचार कराल त्यावेळी तुम्ही, एमसीएकडे रजिस्टर असलेल्या क्रिकेट क्लबमध्ये नाव नोंदणी करायला हवी. त्यांचं प्रतिनिधित्व करायला हवं. हा झाला तुमच्या सिलेक्शनचा पाया. दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे टॅलेंट हे हवंच. तेही इतरांपेक्षा काकणभर जास्त. एका जागेसाठी तुम्हाला हजारोंसोबत स्पर्धा करायची असते. त्यामुळे मेहनत आणि टॅलेंटशिवाय पर्याय नाही.

तुम्ही आपल्या क्लबसाठी खेळायला सुरुवात केल्यानंतर, क्लबने तालुकास्तरीय अथवा विभागीय पातळीवरील स्पर्धेत खेळण्याची तुम्हाला संधी द्यायला हवी. ही या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते. कारण, खेळाडू फक्त क्रिकेट खेळत असतात मात्र, ती स्पर्धा अधिकृत आहे की नाही याबाबत जास्त माहिती घेत नाहीत. महाराष्ट्रासाठी खेळण्याच्या प्रक्रियेतील तुमचे पुढचे पाऊल म्हणजे. तुमची आपल्या जिल्ह्याच्या क्रिकेट संघात निवड होणे. कारण, एमसीए स्ट्रक्चरनुसार, दरवर्षी एमसीए निमंत्रितांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करत असते. यामध्ये एमसीएशी संलग्न असलेल्या सर्व जिल्हा क्रिकेट संघांना निमंत्रित करण्यात येते, आणि त्यामधून महाराष्ट्राचा एक संघ तयार केला जातो.

एमसीएने अंडर १४ ते सिनियर लेवलपर्यंत सर्व टूर्नामेंटला फक्त इंविटेशन लीग असेच नाव दिले आहे. प्रत्येक वयोगटातील ही लीग दरवर्षी खेळली जातेच. पुण्यातील क्लबना याचा, यावेळी देखील थोडाफार फायदा होतो. कारण, पुण्यातील अनेक प्रतिष्ठित क्लबदेखील एमसीएकडून निमंत्रित केले जातात. असे असले तरी झुकते माप हे नेहमीच जिल्हा क्रिकेट संघटनांना राहते.

या इंविटेशन लीगनंतर, एमसीए प्रत्येक वयोगटातील ६० खेळाडूंची निवड करते. नंतर त्यांचे बोर्ड एलेव्हन, सेकंडरी इलेव्हन, चेअरमन इलेव्हन इत्यादी संघ तयार करून, सामने आयोजित केले जातात. अखेर, प्रत्येक वयोगटातून ३० जणांची निवड करत त्यांची नावे बीसीसीआयकडे रजिस्टर केली जातात. यातील अंतिम टप्पा असतो फिटनेस ट्रायल्सचा. तो टप्पा देखील पार करणे अत्यंत गरजेचे असते.

या सर्व इंविटेशन लीग व फिटनेस ट्रायल्सनंतर, महाराष्ट्राचे विविध वयोगटाचे संघ तयार केले जातात. अंडर १४ हा वयोगट फक्त डेव्हलपमेंटसाठी असल्याने, त्यांच्या देशपातळीवर स्पर्धा होत नाहीत. मात्र, अंडर १६ संघाला विजय मर्चंट ट्रॉफी, अंडर १९ संघाला कूच बिहार ट्रॉफी आणि अंडर २३ संघाला सीके नायडू ट्रॉफीमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. यशाची एक एक पायरी चढत अखेर, महाराष्ट्राच्या रणजी संघापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण होते.

तर तुम्हालाही महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळायचे असेल तर, अगदी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया करायला आजपासूनच सुरुवात करा. कारण, आपल्याकडे म्हण आहे ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब.’

रणजी ट्रॉफी खेळायचीय मग हा व्हिडीओ पाहाच । How To Play In Ranji Trophy | Maharashtra Cricket

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

राजस्थानचा ‘रॉयल’ रियान पराग इतका डोक्यात का जातोय? IPLच्या सामन्यात समालोचकांकडूनही खाल्लाय ओरडा

भारताची ऑलिम्पिक होप! शाळेसाठी खाचखळगे अन् काट्यांचा रस्ता तुडवणारा अविनाश साबळे नॅशनल रेकॉर्ड मोडतोय

जितकी चर्चा झाली, खरंच तितका वाद धोनी आणि सेहवागमध्ये होता का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---