---Advertisement---

“वरिष्ठ खेळाडूंचा आदर करायला हवा,” नुकतेच निवृत्त झालेल्या अजिंक्य रहाणेचा भारतीय क्रिकेटला टोला

On: बुधवार, ऑगस्ट 5, 2026 6:43 PM
Ajinkya-Rahane
---Advertisement---

भारताचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतेच क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ अपराजित राहिला, मात्र त्याला आता भारतीय कसोटी क्रिकेटबद्दल चिंता सतावत आहे. त्याने संघातून वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याच्या आणि संघाच्या धोरणावर जोरदार टीका केली आहे.

रहाणेने ‘द ओव्हरलॅप क्रिकेट’ या यूट्यूब चॅनेलवर भारतीय कसोटी क्रिकेटच्या भवितव्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले, “कसोटी क्रिकेटचे चाहते हे खरे क्रिकेटप्रेमी आहेत. गेल्या दोन वर्षांत भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये नवीन खेळाडू आले आहेत. मला अजूनही वाटते की कसोटी क्रिकेटला 7-8 वरिष्ठ क्रिकेटपटू आणि 2-3 युवा खेळाडूंची गरज आहे. पण आता आपण जे पाहत आहोत ते हे की, सर्व खेळाडू खरे तर नवीनच आहेत.”

“आता जवळपास कोणीही वरिष्ठ खेळाडू शिल्लक राहिलेले नाहीत. कसोटी क्रिकेटला त्यांची गरज आहे. तुम्ही वरिष्ठ खेळाडूंचा आदर केला पाहिजे. मला कसोटी क्रिकेटच्या भविष्याची भीती वाटते. विशेषतः भारतीय संघाच्या बाबतीत; सर्व वरिष्ठ खेळाडू एकाच वेळी संघ सोडून जाणे ही एक समस्या बनली आहे,” असेही रहाणेने पुढे म्हटले आहे.

मागील दोन वर्षांत भारताच्या कसोटी संघातून विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन आणि चेतेश्वर पुजारा यांनी निवृत्ती घेतली आहे. आणि आता रहाणेनेही निवृत्ती घेतल्याने भारताची एकंदर उत्तम स्लिप कॉर्डनच पूर्णपणे निवृत्त झाली आहे.

रहाणेने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रेड बॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने फलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षण आणि नेतृत्वही उत्तम केले. त्याने भारतासाठी 85 कसोटी सामने खेळले असून, त्यामध्ये 12 शतक आणि 26 अर्धशतकांच्या सहाय्याने 5077 धावा केल्या आहेत.

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणाऱ्या यादीत तो विराट कोहली नंतर केवळ दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे.

सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. 15 ऑगस्टपासून श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. या संघामध्ये अनुभवाच्या बाबतीत केवळ रवींद्र जडेजा हाच वरिष्ठ खेळाडू आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2025-27 चा भाग असलेल्या या मालिकेत भारत कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---