लंडन। रविवारी (११ जुलै) विम्बल्डन २०२१ स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात अव्वल मानांकित नोवाक जोकोविचने इटलीच्या मतेओ बेरेटिनीविरुद्ध विजय मिळवत कारकिर्दीतील २० वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा इतिहास रचला. तसेच पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या टेनिसपटूंच्या यादीत जोकोविचने राफेल नदाल आणि रॉजर फेडररची बरोबरी केली आहे. नदाल आणि फेडररनेही प्रत्येकी २० वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपदं जिंकली आहेत.
तसेच जोकोविचचे हे एकूण ६ वे विम्बल्डन विजेतेपद आहे. त्यामुळे तो आता सर्वाधिक विम्बल्डन विजेतेपदं जिंकणाऱ्या पुरुष टेनिसपटूंच्या यादीत रॉजर फेडरर(८), विलीयम रेनशॉं(७) आणि पीट सँप्रासपाठोपाठ (७) चौथ्या क्रमांकावर आला आहे. जोकोविचने २०११, २०१४, २०१५,२०१८,२०१९ आणि २०२१ या सहा वर्षी विम्बल्डन विजेतीपदं जिंकली आहेत.
रविवारी ३ तास २३ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात सार्बियाच्या जोकोविचने सातव्या मानांकित बेरेटिनीला ६-७(४), ६-४,६-४,६-३ अशा चार सेटमध्ये पराभूत केले. जोकोविचचा कारकिर्दीतील हा ३० वा ग्रँडस्लॅम स्पर्धचा अंतिम सामना होता. तर २५ वर्षीय बेरेटिनीचा हा कारकिर्दीतील पहिलाच ग्रँडस्लॅमचा अंतिम सामना होता.
या सामन्यात जोकोविचने ५-२ अशी पहिल्याच सेटमध्ये आघाडी घेत चांगली सुरुवात केली होती. मात्र, नंतर बेरेटिनीने पुनरागमन करत हा सेट टायब्रेकरमध्ये नेला. टायब्रेकरमध्ये बेरेटिनीने विजय मिळवत आघाडी घेतली. यानंतर मात्र, जोकोविचने आपल्या अनुभवाचा उपयोग करत बेरेटिनीला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. त्याने पुढील तीनही सेट आपल्या नावावर करत कारकिर्दीतील २० व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर नाव कोरले.
🏆 2011
🏆 2014
🏆 2015
🏆 2018
🏆 2019
🏆 2021#Wimbledon | @DjokerNole pic.twitter.com/UrFvlsgIzY— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2021
जोकोविचने त्याच्या कारकिर्दीत ६ वेळा विम्बल्डन जिंकण्याव्यतिरिक्त ९ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, २ वेळा फ्रेंच ओपन आणि ३ वेळा यूएस ओपनची विजेतीपदं जिंकली आहेत. विशेष म्हणजे २०२१ वर्ष जोकोविचसाठी लाभदायक ठरत आहे. त्याने या वर्षातील आत्तापर्यंत झालेल्या तीनही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे जर त्याने यावर्षीची यूएस ओपन स्पर्धाही जिंकली, तर तो कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करेल. कॅलेंडर ग्रँडस्लॅम म्हणजे एका वर्षात होणाऱ्या सर्व ४ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणे.
महत्त्वाच्या बातम्या –
“श्रीलंकेचा दुसर्या दर्जाचा संघात मैदानात उतरला, तर मालिकेला काहीच अर्थ राहणार नाही”