जसे क्रिकेटमध्ये त्रिशतक करणे दुर्मिळ गोष्ट आहे तसेच हॅट्रिक घेणेही दुर्मिळच गोष्ट आहे. पण २००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९ वेळा हॅट्रिक घेण्यात आली आहे. तर एकूण १६ गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली आहे.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅट्रिक अमित मिश्राने घेतली आहे. त्याने तीन वेळा हा कारनामा केला आहे. तसेच युवराज सिंगने दोन वेळा हॅट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही हॅट्रिक त्याने २००९ मध्ये घेतल्या आहेत. अन्य १४ गोलंदाजांनी प्रत्येकी एक वेळा हॅट्रिक घेतली आहे.
आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणाऱ्या एकूण १६ गोलंदाजांमध्ये ७ वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. त्यांचाच या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे वेगवान गोलंदाज –
७. लक्ष्मीपती बालाजी (चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, २००८)
आयपीएलच्या पहिल्याच मोसमात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने १० मे २००८ ला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध हॅट्रिक घेतली. होती. या सामन्यात चेन्नईने पंजाबला १८२ धावांचे आव्हान दिले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने १९ षटकापर्यंत १५५ धावा केल्या होत्या. त्यांना शेवटच्या षटकात २७ धावांची आवश्यकता होती. हे षटक चेन्नईकडून बालाजीने टाकले होते. या षटकात पहिल्याच चेंडूवर इरफान पठाणने षटकार खेचला तर दुसऱ्या चेंडूवर २ धावा काढल्या त्यामुळे पंजाबसमोर ४ चेंडूत १९ धावांचे आव्हान होते. त्यावेळी बालाजीने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर इरफानने लेग साईडच्या स्क्वेअर बाऊंड्रीच्या दिशेने फटका मारला पण त्यावेळी सुरेश रैनाने त्याचा शानदार झेल घेतला.
त्याच्या पुढच्याच चेंडूवर पियुष चावलाही झेलबाद झाला. त्याचा झेल चामरा कपुगेदराने घेतला. तर पाचव्या चेंडूवक व्हीआरव्ही सिंगने यष्टीरक्षक एमएस धोनीला झेल दिला. त्यामुळे बालाजीने हॅट्रिक साजरी केली. त्याचबरोबर चेन्नईचा विजयही निश्चित केला.
६. मखाया एन्टीनी (चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २००८)
२००८ च्या आयपीएल मोसमात चेन्नई सुपर किंग्सकडून बालाजी नंतर वेगवान गोलंदाज मखाया एन्टीनीने हॅट्रिक घेतली होती. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध इडन गार्डनला झालेल्या सामन्यात ही हॅट्रिक घेतली होती.
त्याने त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताविरुद्ध ५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सौरव गांगुलीला त्रिफळाचीत केले होते. त्यानंतर त्याला १७ व्या षटकात पुन्हा गोलंदाजी देण्यात आली. यावेळी त्याने पहिल्या चेंडूवर देबब्रत दासला त्रिफळाचीत केले. तर दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड हसीला त्रिफळाचीत करत हॅट्रिक साजरी केली. त्यावेळी तो आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला परदेशी गोलंदाज होता.
त्या सामन्यात कोलकाताने ५ बाद १४९ धावा करत चेन्नईला ला १५० धावांचे आव्हान दिले होते. पण चेन्नई फलंदाज करत असताना पावसाचा व्यत्यय आला. त्यावेळी चेन्नईने बिनबाद ५५ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना डकवर्थ लूईस नियमानुसार विजेते घोषित करण्यात आले.
५. प्रविण कुमार (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स,२०१०) –
२०१० च्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणाऱ्या प्रविण कुमारने राजस्थान रॉयल्स विरुद्ध हॅट्रिक घेण्याची कमाल केली होती. त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान विरुद्ध १७ व्या षटकात गोलंदाजी करताना हॅट्रिक घेतली होती.
या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने फलंदाजी करत असलेल्या डॅमियन मार्टिन धीम्या गतीचा यॉर्कर टाकला आणि त्याला त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्याच चेंडू प्रविणने शॉर्ट लेंथचा टाकला. त्यावेळी सुमित नरवालने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण डिप बाऊंड्रीला पळत जात मनिष पांडेने त्याचा झेल घेतला. त्याच्या पुढील चेंडूवर प्रविणने पारस डोग्राला मधला स्टंप उडवत त्रिफळाचीत केले आणि हॅट्रिकची नोंद केली.
त्या सामन्यात राजस्थानला प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ९२ धावाच करता आल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोरने ११ षटकांच्या आतच ९३ धावा करत हा सामना १० विकेट्सने जिंकला.
४. शेन वॉट्सन (राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद, २०१४)
पहिल्या मोसमापासून २०१५ पर्यंत राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू असलेल्या शेन वॉट्सनने २०१४ ला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी राजस्थानचा कर्णधार असलेल्या वॉट्सनने चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हैद्राबादचा कर्णधार शिखर धवनला त्रिफळाचीत केले होते.
त्यानंतर वॉट्सनने १७ व्या षटकात पुन्हा गोलंदाजीसाठी येत पहिल्या चेंडूवर मोझेस हेंड्रिक्सला बाद केले. त्याचा झेल अजिंक्य रहाणेने घेतला होता. तर त्याच्या पुढच्याच चेंडूवर वॉट्सनने कर्ण शर्माला यष्टीरक्षक संजू सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. तसेच त्यामुळे वॉट्सनने त्याची हॅट्रिकही साजरी केली.
तो आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा मखाया एन्टीनी नंतरचा दुसराच परदेशी वेगवान गोलंदाज आहे. विशेष म्हणजे त्या सामन्यात वॉट्सनने केवळ २ षटकातच गोलंदाजी केली होती.
त्या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १३४ धावा करत राजस्थानला १३५ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला केवळ सर्वबाद १०२ धावाच करता आल्यामुळे हैद्राबादने हा सामना ३२ धावांनी सहज जिंकला.
३. अँड्र्यू टाय (गुजरात लायन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्स, २०१७)
२०१७ ला गुजरात लायन्सकडून खेळताना अँड्र्यू टायने रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध पदार्पण केले होेते. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने हॅट्रिक घेण्याचीही कामगिरी केली. त्याने या सामन्यात पहिले ३ षटके चांगली कामगिरी करत २ विकेट्स घेण्यात यश मिळवले होते. पण त्याने त्याचे चौथे षटक टाकताना हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली.
त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुण्याविरुद्ध २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अंकित शर्माला झेलबाद केले. त्याचा झेल ब्रेंडन मॅक्यूलमने घेतला. तर त्याच्या पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोज तिवारीला टायने बाद केले. तिवारीचा झेल बाऊंड्रीलाईनजवळ इशान किशनने घेतला. तर तिसऱ्या चेंडूवर टायने यॉर्कर टाकत शार्दुल ठाकूरला त्रिफळाचीत केले आणि हॅट्रिक साजरी केली.
त्यावेळी तो पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. या सामन्यात पुण्याने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १७१ धावा करत गुजराजला १७२ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान गुजरातने १८ षटकात ३ विकेट्स गमावत सहज पार केले आणि हा सामना ७ विकेट्सने जिंकला.
२. जयदेव उनाडकट (रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद,२०१७)
२०१७ च्या आयपीएल मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध हॅट्रिक घेतली होती. ६ मे २०१७ ला झालेल्या या सामन्यात पुण्याने प्रथम फलंदाजी करताना हैद्राबादला १४९ धावांचे आव्हान दिले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबादला शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. त्यावेळी हैद्राबादकडून राशिद खान आणि बिपूल शर्मा फलंदाजी करत होते. तसेच पुण्याच्या कर्णधार स्टिव्ह स्मिथने हे षटक टाकण्यासाठी जयदेवला चेंडू सोपवला. त्याआधी त्या सामन्यात जयदेवने ३ षटकात ३० धावा दिल्या होत्या. पण शेवटच्या षटकात मात्र त्याने शानदार गोलंदाजी केली.
त्याने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. तर दुसऱ्या चेंडूवर बिपुल शर्माला झेलबाद केले. त्याचा शानदार झेल बेन स्टोक्सने घेतला. तिसऱ्या चेंडूवर राशिदने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र तो चेंडू इतका उंच गेला की उनाडकटने सहज हा चेंडू झेललाही. चौथ्या चेंडूवर उनाडकटने भुवनेश्वर कुमारला मनोज तिवारी करवी झेलबाद केले. त्यामुळे उनाडकटने त्याची हॅट्रिक पूर्ण केली. तसेच त्याने आयपीएलमधील त्याचे १०० विकेट्ही पूर्ण केल्या. उनाडकटने ते पूर्ण षटक निर्धाव टाकत पुण्याला हा सामना १२ धावांनी जिंकून दिला.
१. सॅम करन (किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०१९)
२०१९ च्या आयपीएल मोसमात युवा वेगवान गोलंदाज सॅम करनने किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना १ एप्रिल २०१९ ला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. या सामन्यात पंजाबने १६७ धावांचे आव्हान दिल्लीला दिले होते. ज्यावेळी शेवटच्या ३ षटकात दिल्लीला २३ धावांची आवश्यकता होती, तेव्हा करनने १८ व्या षटकात चौथ्या चेंडूवर कॉलिन इंग्रामला बाद केले. त्यांनंतर त्याने शेवटच्या चेंडूवर दिल्लीच्या हर्षल पटेलला बाद केले.
त्यानंतर पुन्हा करनला २० व्या षटकात गोलंदाजी देण्यात आली. त्याने २० व्या षटकात गोलंदाजीला येत पहिल्या दोन चेंडूवरच अनुक्रमे कागिसो रबाडा आणि संदिप लामिछाने यांना बाद करत हॅट्रिक साजरी केली. त्याचबरोबर पंजाबला १४ धावांनी विजय मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला.
त्याने जेव्हा ही हॅट्रिक घेतली तेव्हा त्याचे वय २० वर्षे ३०२ दिवस एवढे होते. त्यामुळे करन हा आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू देखील ठरला होता.