सध्या भारतीय महिला क्रिकेटला सोन्याचे दिवस आले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण, मागील जवळपास पाच वर्षाच्या काळापासून भारतीय महिला क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे पाहायला मिळतेय. पूर्वी अत्यंत धीम्या गतीने खेळणाऱ्या भारतीय महिला फलंदाज आता अगदी तुफानी फटकेबाजी करताना दिसतात. या सर्वांमध्ये अग्रेसर आहे संघातील सर्वात लहान वयाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा (Shefali Verma). तिच शफाली आज १९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. तिच्या आजवरच्या या क्रिकेट प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया.
सन २०१३ मध्ये भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर रणजी ट्रॉफी. सामना खेळण्यासाठी हरियाणातील लाहली येथे आला होता. तेव्हा प्रेक्षकांमध्ये सामना पाहताना सचिन-सचिनचा आवाज ऐकून शफालीचे क्रिकेटर बनण्याचे स्वप्न आणखी दृढ झाले. वयाच्या दहाव्या वर्षी ती लेदर बॉलने खेळू लागली. त्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी ती क्रिकेट अकादमीत दाखल झाली. जिथे तीने कनिष्ठ श्रेणीपासून सुरुवात केली. ती लहान वयात खूप छान खेळायची. एकत्र खेळणाऱ्या मुली चांगल्या खेळाडू होत्या. पण शफालीमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त क्षमता होती. हे पाहून त्यांनी तीला मुलांसोबत सराव करायला लावला. अनेक वेळा तिने फाटलेले ग्लोव्हज व तुटलेली बॅट घेऊन सराव देखील केला होता.
अडीच वर्ष तीनी मुलांच्या गोलंदाजीचा सामना करत सराव केला. तीने अंडर-१९, अंडर-२३ आणि रणजी खेळाडूंविरूद्ध खूप सराव केला. सचिनची चाहती असलेल्या शफाली हिने नोव्हेंबर २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ४९ चेंडूत ७३ धावांची धमाकेदार खेळी करून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा सचिनचाच विक्रम मोडला. तेव्हापासून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तीने सातत्याने चांगला खेळ केला.
ऑस्ट्रेलियामध्ये २०२० च्या सुरुवातीला झालेला महिला टी२० विश्वचषक तिला खरी ओळख मिळवून देऊन गेला. आपल्या तुफान फटकेबाजीने तिने सर्वांचीच मने जिंकली. दोन सामन्यांमध्ये ती सामनावीर ठरली. ऑस्ट्रेलियातील मोठ्या मैदानांवर सहजरीत्या षटकार ठोकण्याची तिची ताकद पाहून क्रिकेट पंडित अवाक झाले. ती स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणारी फलंदाज ठरली होती. हा विश्वचषक संपताच ती महिला टी२० फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचली.
भारतीय महिला संघाने मोठ्या कालावधीनंतर २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला. दोन्ही गावांमध्ये तिने गोलंदाजांवर अजिबात दयामाया न दाखवता अर्धशतके पूर्ण केली. तिच्या याच शैलीमुळे तिची तुलना भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सहवाग याच्याशी केली जाते. तिला अनेक जण ‘लेडी सेहवाग’ या नावानेदेखील संबोधतात.
अशी आहे आजवरची कारकीर्द
आपल्या कारकिर्दीत शफालीने अनेक विक्रम नोंदवले आहेत. ती भारतासाठी सर्वात कमी टी२० पदार्पण करणारी खेळाडू आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम देखील तिच्या नावावर आहे. तिची खासियत म्हणजे ती भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी महिलांची आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वुमेन्स टी२० लीगमध्ये सामील झाली होती. ती द हंड्रेड लीग व महिला बिग बॅश या स्पर्धांमध्ये देखील सहभागी झाली आहे. आपल्या लहानशा कारकिर्दीत तिने आत्तापर्यंत २ कसोटी, ६ वनडे व २८ टी२० सामने खेळले आहेत. आपल्या १९ व्या वाढदिवसाच्या चार दिवस आधीच ती पुन्हा एकदा टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आली आहे. फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंड येथे होणाऱ्या वनडे महिला विश्वचषकात तिच्या कामगिरीवर सर्वांच्याच नजरा असतील.
महत्वाच्या बातम्या-
मुंबईकडे आयपीएल २०२२ चे यजमानपद! बीसीसीआयने केला आयोजनाचा मास्टरप्लॅन (mahasports.in)