भारतीय महिला क्रिकेट संघाची १७ वर्षीय आक्रमक फलंदाज शेफाली वर्माने मागील काही महिन्यांमध्ये जागतिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. तिने मागील महिन्यातच शानदार कसोटी पदार्पण केले होते. आता तिने त्याच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची परिक्षा उत्तीर्ण केली आहे, ती परिक्षा म्हणजे १० वी बोर्डाची परिक्षा.
गुरुवारी हरियाणा बोर्डाने घेतलेल्या १० वीच्या परिक्षांचे निकाल जाहीर झाले. या परिक्षेत शेफालीला ५२ टक्के गुण मिळाले आहेत. तिच्या या यशामुळे तिचे कुटुंबिय खूश आहेत. शेफालीने मार्चमध्ये १० वीची परिक्षा दिली होती. हरियाणा बोर्डाच्या अध्यक्षांनीही शेफालीचे कौतुक केले आहे.
शेफाली सध्या भारतीय महिला संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिने याच दौऱ्यातून कसोटी क्रिकेटमध्ये जून महिन्यात पदार्पण केले आहे. तिने पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच आपली छाप पाडताना दोन्ही डावात अनुक्रमे ९६ आणि ६३ धावांच्या अर्धशतकी खेळी केल्या. तसेच पदार्पणाच्या कसोटी सामन्यात तीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला.
याच इंग्लंड दौऱ्यात तिने कसोटी पदार्पण गाजवल्यानंतर वनडेमध्येही पदार्पण केले. वनडेत तिला फार खास कामगिरी करता आली नसली तरी तिने इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत अनुक्रमे १५, ४४ आणि १९ धावा केल्या. यापूर्वी शेफालीने २०१९ सालीच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
तिने ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा तिचे वय अवघे १५ वर्षे २३९ दिवस होते. त्यामुळे ती भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण करणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली होती. तिने आत्तापर्यंत २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ३ अर्धशतकांसह ६१७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० च्या जमान्यात ५७ वर्षापासून अबाधित आहे ‘हा’ विश्वविक्रम, सेहवाग पोहोचला होता सर्वात जवळ
तिरंदाजीपटू दीपिका कुमारी आणि गौतम गंभीर आमने-सामने, तिरंदाजी मैदान तोडण्याचा घातला जातोय घाट