दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी (२४ ऑक्टोबर) क्रिकेटचा बहुप्रतिक्षित सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. भारतीय संघाची सराव सामन्यातील कामगिरी पाहता भारतीय संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पाकिस्तानी गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला. या सामन्यात पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याने घातक गोलंदाजी करत भारतीय संघाच्या चिंतेत वाढ केली. परंतु १९ व्या षटकात त्याने असे काही केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
पाकिस्तान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तान संघाने अप्रतिम गोलंदाजी केली आणि भारतीय संघाला कमी धावांवर रोखले. यात शाहीन आफ्रिदीचा मोठा वाटा राहिला. परंतु १९ व्या षटकात त्याच्या हातून एक चूक घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
तर झाले असे की, पाकिस्तान संघाची गोलंदाजी सुरू असताना १९ वे षटक टाकण्यासाठी शाहीन आफ्रिदी गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील ५ वा चेंडू त्याने नो चेंडू टाकला, ज्यावर हार्दिक पंड्याने ऑफ साईडच्या दिशेने चौकार मारला. त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने शॉर्ट पीच चेंडू टाकला, ज्यावर हार्दिक पंड्या पूर्णपणे बिट झाला.
चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेल्यानंतर त्याने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यष्टीरक्षकाने चेंडू गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे फेकला. शाहीन आफ्रिदीने नॉन स्ट्राइकला धावत असलेल्या हार्दिक पंड्याला बाद करण्यासाठी जोराने थ्रो केला. परंतु तो चेंडू यष्टीला न लागता, सरळ सीमारेषेच्या दिशेने गेला आणि भारतीय संघाला अतिरिक्त ४ धावा मिळाल्या. हे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित अक्षय कुमार आणि बीसीसीआय सचिव जय शहा आनंदाने नाचू लागले.
https://www.instagram.com/reel/CVar-RGlAAm/?utm_medium=copy_link
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीने ५७ धावांची खेळी केली. रिषभ पंतने ३९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने नाबाद ७९ आणि बाबर आजमने नाबाद ६८ धावा करत पाकिस्तान संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ही धोक्याची घंटा नव्हे, ही तर सुरुवात’, पाकिस्ताविरुद्धच्या पराभवानंतर कोहलीने वाढवले संघाचे मनोबल
टी२० विश्वचषक: दोन दिवसांत दोन संघांनी रचला इतिहास; केली नवी सुरुवात