गुजरात टायटन्सचा फलंदाज शाहरुख खानच्या बॅटला लागलेला गंज आता दूर झाला आहे. त्यानं रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध झंझावाती अर्धशतक झळकावलं.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शाहरुखनं 30 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 58 धावा केल्या. विशेष म्हणजे, त्यानं अवघ्या 24 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं शाहरुख खानला बॅटिंग ऑर्डरमध्ये बढती दिली होती. तो चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, ज्याचा त्यानं पुरेपूर फायदा घेतला.
28 वर्षीय शाहरुख खानच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलंच अर्धशतक आहे. त्याची यापूर्वीची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 47 होती. त्यानं एप्रिल 2021 मध्ये पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. मुळचा तामिळनाडूच्या असलेल्या या विस्फोटक फलंदाजाला गुजरात टायटन्सनं आयपीएल 2024 च्या लिलावात तब्बल 7 कोटी 40 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. चालू मोसमात आरसीबीविरुद्ध अर्धशतक ठोकण्यापूर्वी तो चार सामन्यांमध्ये फलंदाजीला आला होता. परंतु तो एकदाही 15चा आकडा देखील गाठू शकला नव्हता.
बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात 45 धावांत दोन गडी बाद झाल्यानंतर शाहरुखनं साई सुदर्शनसोबत मजबूत भागीदारी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 86 धावा जोडल्या. शाहरुख 15व्या षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा बळी ठरला. सिराजनं शाहरुखला अचूक यॉर्करवर बोल्ड केलं. तो मिडविकेटवर हवेत शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू बॅट आणि पॅडमधून गेला.
शाहरुख खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यानं तामिळानाडू क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये खोऱ्यानं धावा गोळा केल्या आहेत. मात्र आयपीएलमध्ये तो आतापर्यंत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. शाहरुख खाननं आयपीएलच्या 36 डावांमध्ये फलंदाजी करताना 514 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 19.77 आणि स्ट्राईक रेट 141.21 एवढा राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
ग्लेन मॅक्सवेलचा जोरदार कमबॅक! 3 सामन्यांच्या ब्रेकनंतर परतताच घेतली कर्णधार गिलची विकेट
मोठी बातमी! भारताला विश्वचषक जिंकवून देणारे गॅरी कर्स्टन बनले पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक