श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या टी २० तिरंगी मालिकेतील उर्वरीत सामन्यांसाठी शाकिब अल हसन बांगलादेश संघात पुनरागमन करणार आहे. बोटाला झालेल्या दुखापतीमधून हा खेळाडू सावरला अाहे.
बांगलादेश या मालिकेत ३ पैकी १ सामना जिंकला असून भारताविरूद्ध होणारा अंतिम सामना जर जिंकायचा असेल तर त्यांना विजय अनिवार्य आहे. कारण बांगलादेशप्रमाणेच श्रीलंकाही या मालिकेत केवळ एक सामना जिंकली आहे.
शाकिबच्या अनुपस्थितीत बांग्लादेशचे नेतृत्व उपकर्णधार महमुदुल्लाह रियादने केले होते.
ही स्पर्धा सुरु होण्याआधीच बांग्लादेशला धक्का बसला होता. नियमित कर्णधार असलेल्या शाकिब अल हसनला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागणार होते. शाकिबला मागील महिन्यात पार पडलेले श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामने आणि २ टी २० सामन्यांनाही मुकावे लागले होते.
शाकिबला जानेवारी महिन्यात तिरंगी वनडे मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना बोटाची दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो आता सावरला आहे.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने शाकिबला दुखापतीवर उपचार करण्यासाठी थायलंडला पाठवले होते. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याला ही दुखापत बरी होण्यासाठी आणखी वेळ लागेल असे सांगितले आहे.