इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी (२५ सप्टेंबर) डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे संघ आमने सामने होते. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा होता. परंतु त्यांना पंजाब किंग्स संघाने ५ धावांनी पराभूत केले आहे. यासह सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल २०२१ स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली या संघाला एकही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे संघ व्यवस्थापकांनी केन विलियमसनला संघाचे कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दुसऱ्या टप्प्यात देखील या संघाची सुमार कामगिरी सुरूच आहे.
स्पर्धेतील ९ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला ८ वेळेस पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह सनरायझर्स हैदराबाद संघ साखळी फेरीतील ९ पैकी ८ सामन्यात पराभूत होणारा दुसराच संघ ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावे होता. २००९ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना सौरव गांगुली यांना ९ पैकी एकाच सामन्यात विजय मिळवून देण्यात यश आले होते.
तर दुसरीकडे केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्स संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. पंजाबला या सामन्यात अवघ्या १२५ धावा करण्यात यश आले होते. त्यामुळे अनेकांना असे वाटले होते की, पंजाब संघ हा सामना गमावणार. परंतु पंजाबच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत या धावांचा बचाव केला आणि विजय मिळवला. पंजाब संघाने दुसऱ्यांदा कमी धावांचा बचाव करत विजय मिळवला आहे. १२ वर्षांपूर्वी २००९ मध्ये डरबनमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला १२० धावांचा पाठलाग करण्यापासून थांबवले होते.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब संघाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पंजाब संघाकडून एडेन मार्करमने २७ तर केएल राहुलने २१ धावांचे योगदान दिले. या डावात पंजाब संघाला २० षटकअखेर ७ बाद १२५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबाद संघाकडून जेसन होल्डरने नाबाद ४७ धावांची खेळी केली. तर वृद्धिमान साहाने ३१ धावांचे योगदान दिले. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी आव्हानाच्या अगदी जवळ जाऊन सनरायझर्स हैदराबाद संघाला ५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेच्या बाजूने पंचांचा ‘तो’ निर्णय; मग जडेजाने केलं असं काही की, आरसीबी समर्थकांना लागली मिरची
फक्त क्रिकेटर नव्हे तर धोनी माणूस म्हणूनही खूप मोठा, सर्वांपुढे स्टाफ मेंबरला ठोकला ‘सॅल्यूट’






