आयपीएलच्या 2020 या हंगामात राजस्थान रॉयल्सचा युवा प्रतिभावान खेळाडू संजू सॅमसनने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन्ही संघाविरुद्ध तुफान फटकेबाजी केली होती. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू आणि राजस्थान रॉयल्सचा सल्लागार शेन वॉर्न यानेही त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याला विश्वास आहे की सॅमसन हा भारतीय क्रिकेट संघाकडून तीनही प्रकारात खेळू शकतो.
सॅमसन आहे दर्जेदार खेळाडू
शेन वॉर्नने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “मी बर्याच काळापासून असे म्हणतो आहे की संजूने खेळाच्या तीनही स्वरूपात भारताकडून खेळावे. तो दर्जेदार खेळाडू आहे. पहिल्या सामन्यातच त्याने त्याचे कौशल्य दाखवले. मला आशा आहे की या हंगामात तो सातत्याने चांगले प्रदर्शन करेल.”
लवकरच करेल भारतीय संघाचे प्रतिनिधित्व
पुढे बोलताना तो म्हणाला, “जर त्याने या स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली, तर तो भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. तो एक अतिशय हुशार खेळाडू आहे. मी माझ्या काळात बर्यापैकी प्रतिभावान क्रिकेटपटू पाहिले आहेत. पण जेव्हा मी त्याच्यासोबत वेळ घालवतो, त्याला नेटमध्ये फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा असे जाणवते की त्याच्यात काहीतरी खास कौशल्य आहे. तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसेल.”
राजस्थान संघ आवडतो
राजस्थान रॉयल्सचा सल्लागार म्हणून पुन्हा वॉर्नची निवड करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मला वाटते रॉयल्सशी माझा आध्यात्मिक संबंध आहे. 2008 च्या हंगामात या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यावेळी मी या संघाचा भाग होतो. या संघाबरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि आशा आहे की मी सतत या संघाबरोबर काम करत राहील. हा संघ मला खूप आवडतो.”
स्टॅन्डमध्ये बसून पाहतो सामना
सल्लागाराच्या भूमिकेविषयी बोलताना वॉर्न म्हणाला, “यावर्षी सल्लागाराची भूमिका काही वेगळी आहे. मी स्टँडमध्ये बसून सामना पाहतोय. मी या वर्षी डगआऊटमध्ये बसत नाही. मी इतर प्रेक्षकांप्रमाणेच सामना पाहात आहे आणि प्रत्येक सामन्यानंतर प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथसमवेत वेळ घालवतो आणि सामन्याविषयी बोलतो. जर सामन्यादरम्यान मला काही सूचना द्यायच्या असतील, तर मी त्यांच्याशी बोलतो. मी त्यांच्या कल्पना ऐकतो आणि माझे विचार देखील त्यांना सांगतो.”