महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग (MWPL) 2025 च्या शुक्रवारी (6 जून) झालेल्या सामन्यात, सोलापूर स्मॅशर्सचा सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध झाला. सोलापूर स्मॅशर्स संघाने हा सामना सहज आपल्या नावे केला. मात्र, या सामन्यात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी जेट्सने फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर 20 षटकांत 120 धावा केल्या. रत्नागिरीची कर्णधार स्मृती मंधाना लवकर बाद झाली. शरयू कुलकर्णीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक दामिनी बनकरकडे तिने झेल सोपवला. डावाच्या चौथ्या चेंडूवर ती एका धावेवर माघारी परतली. या चेंडूवर पंचांनी वाइडचा इशारा दिला होता. मात्र, स्मृतीने खिलाडूवृत्ती दाखवत स्वतः मैदान सोडले.
त्यानंतर शरयू कुलकर्णी हिने केलेल्या सेलिब्रेशनमुळे लवकरच ही घटना व्हायरल झाली. स्मृति बाद आहे हे समजल्यावर शरयू हिने मैदानात समरसॉल्ट मारले. भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याने नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध शतक झळकावल्यानंतर अशाप्रकारे स्पायडरमॅन सेलिब्रेशन केलेले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रत्नागिरी संघ केवळ 120 धावा बनवू शकलेला. आरती केदार व आचल अगरवाल यांनी प्रत्येकी तीन बळी टिपलेले. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सोलापूर संघासाठी कर्णधार तेजल हसबनीस हिने नाबाद 42 धावांची खेळी करत आपल्या संघाला विजयी बनवले. एमसीए आयोजित करत असलेली डब्ल्यूएमपीएल भारतातील राज्य क्रिकेट संघटनांतर्फे महिला क्रिकेटपटूंसाठी आयोजित केली जाणारी एकमेव लीग आहे.






