भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने इंग्लंड संघाचा १५७ धावांनी पराभव केला आहे. विजयासाठी आवश्यक असलेल्या ३६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव सामन्याच्या शेवटच्या दिवशी २१० धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाजानी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि भारताला दूसरा कसोटी विजय मिळवून दिला. दरम्यान शार्दूल ठाकुरने या सामन्यात जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करत नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.
शार्दूल ठाकुरने या सामन्यात दोन्ही डावात अर्धशतक झळकावून भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. तसेच तीन गडी देखील बाद केले. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. याआधी भुवनेश्वर कुमारने अशी कामगिरी केली होती. विशेष म्हणजे सन १९६९ पासून अशी कामगिरी फक्त दोन भारतीयांना जमली आहे. आता शार्दूलचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.
भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने कमालीची गोंलदाजी केली आणि भारताला मालिकेतील दूसरा कसोटी विजय मिळवून दिला. इंग्लंडने पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात २७ षटकात दोन गड्यांच्या बदल्यात ५४ धावा केल्या. तर दुसऱ्या सत्रात २५ षटकात ६२ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट गमावल्या. भारताकडून उमेश यादवने ३, तर बुमराह, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.
तत्पूर्वी भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत इंग्लडपुढे ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रोहित शर्माचे शतक सामन्याचे आकर्षण ठरले. पुजारा, शार्दूल, पंत यांनीही अर्धशतकीय खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय संघाने ओव्हलमध्ये ५० वर्षानंतर विजय संपादन केला आहे. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी मिळवली आहे. शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून मॅन्चेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
किती रे मोठं मन तुझं! ‘सामनावीर’ पुरस्कार मिळूनही रोहित म्हणे, मी नाही खरा नायक तर ‘तो’ आहे
ऐतिहासिक विजयासह भारताची ‘गरुडझेप’, कसोटी चँपियनशीप गुणतालिकेत पुन्हा अग्रस्थानी; पाकिस्तानला पछाडले