इंडियन प्रीमीयर लीग २०२२ अनेक गोष्टींमुळे वेगळा ठरणार आहे. आयपीएलच्या या १५ व्या हंगामात ८ ऐवजी १० संघ खेळताना दिसणार आहेत. यामध्ये अहमदाबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन संघ नव्याने स्पर्धेत दाखल झाले आहेत. दरम्यान, लखनऊने केएल राहुलला कर्णधार म्हणून नेमले आहे. आता या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा मोठा लिलाव होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघच नव्याने बांधला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंमध्ये एक मजेशील संभाषण झाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये केएल राहुलसह (KL Rahul) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दिसून येत आहे. या तिघांमध्ये आयपीएलबाबत एक गमतीशीर संवाद झालेला पाहायला मिळत आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, शार्दुलने केएल राहुलला विचारले की जर लखनऊ संघ जर त्याला लिलावात घेण्याचा विचार करत असेल, तर त्यांचे बजेट किती रुपयांचे आहे. यावर केएल राहुल मजेने बेस प्राईज म्हणजेच मुळ किंमत असे उत्तर देतो. पण याचवेळी त्यांच्याबरोबर बसलेला युजवेंद्र चहल म्हणतो की, ‘भाई, ईश्वरासाठी कोणतेच बजेट नसते.’
चहलने अशी टिप्पणी केली, कारण शार्दुलला ‘लॉर्ड शार्दुल’ असे म्हणून ओळखले जाते. अनेकदा सहकारी खेळाडू आणि चाहते त्याला या नावाने पुकारतात. याचाच संदर्भ घेत चहलने शार्दुलची मस्करी केली आहे.
https://www.instagram.com/reel/CZBtSdmB0o3/
दरम्यान, आयपीएल २०२२ लिलावापूर्वी (IPL 2022 Auction) शार्दुलला चेन्नई सुपर किंग्सने आणि युजवेंद्र चहलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुक्त केले आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच केएल राहुलला लिलावापूर्वी लखनऊ सुपरजायंट्सने १७ कोटींसह संघात सामील करत नेतृत्त्वपद दिले आहे. त्याच्याव्यतिरिक्त लखनऊने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि युवा भारतीय गोलंदाज रवी बिश्नोईला संघात स्थान दिले आहे. फ्रँचायझीने स्टॉयनिससाठी ९.२ कोटी व बिश्नोईसाठी ४ कोटी रुपये मोजले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् स्टिव्ह स्मिथने स्वत:वरच मीम बनवत नामकरणही केले, ‘त्या’ इंस्टाग्राम पोस्टमागचा हेतू तरी काय?
रोहित-द्रविड जोडीवर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, ‘ते दोघे भारताला…’
U19 WC: कोरोनाचा कहर! ‘या’ संघातील ९ खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने २ सामने रद्द
व्हिडिओ पाहा – २०१९ विश्वचषक सेमीफायनलनंतर काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये