भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या सुट्टीवर आहेत. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाला आता थेट सप्टेंबरच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध पुढील मालिका खेळायची आहे. त्याआधी खेळाडू एकतर विश्रांती घेत आहेत किंवा त्यांच्या राज्यातील लीगमध्ये भाग घेत आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) एक धक्कादायक खुलासा केला आहे. शार्दुलने सांगितले की, 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताच्या खेळाडूंना खूप त्रास दिला होता.
शार्दुल ठाकूरने सांगितले की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये चार-पाच दिवस हाऊस किपींग सेवा नव्हती. जर तुम्हाला बेडशीट बदलून घ्यायची असेल तर, थकलेले असताना देखील तुम्हाला पाच मजले चढावे लागत. तेव्हाचा ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेन मुलाखतींमध्ये सतत खोटे बोलत होता, तो फक्त आपली प्रतिमा वाचवत होता.”
शार्दुल पुढे म्हणाला, “मला सत्य माहीत आहे. विराट कोहली जेव्हा ऑस्ट्रेलियातून परतला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रवी शास्त्री यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत आपल्या हक्कांसाठी सतत संघर्ष केला होता.” भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर 2-1 असा पराभव केला होता. भारताने गेल्या दोन दौऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आहे.
भारतीय संघाला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. जिथे ते पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. यावेळी पर्थमधून मालिकेला सुरुवात होणार आहे. याशिवाय ऍडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथेही कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होईल. तर शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. तसेच, नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यापुढे ही मालिका जिंकण्याचे सर्वात मोठे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
सायना नेहवालचे जसप्रीत बुमराहला चॅलेंज! म्हणाली, “तो माझ्या स्मॅशसमोर टिकू शकणार नाही”
“मला ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे” दिग्गज फिरकीपटूनं व्यक्त केली इच्छा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल, पदकांचा रंग एका आठवड्यात उडाला!