इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५७ धावांनी विजय मिळवला. यासह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने अप्रतिम कामगिरी केली.
त्याने फलंदाजी करताना दोन्ही डावात अर्धशतक झळकावले होते. तसेच गोलंदाजी करताना देखील त्याने ३ इंग्लिश फलंदाजांना माघारी धाडले होते. या कामगिरीनंतर सर्वत्र शार्दुल ठाकूरची चर्चा रंगली आहे. दरम्यान, शार्दुल ठाकूरची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामधे तो एमएस धोनीचे कौतुक करताना दिसून येत आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेनच्या गाबा कसोटी कसोटीत विजय मिळवून देण्यात शार्दुल ठाकूरने मोलाची भूमिका पार पाडली होती. त्यावेळी त्याने खुलासा केला होता की, जेव्हा तो कसोटी संघातून बाहेर होता तेव्हा एमएस धोनीने त्याला भरपूर मदत केली होती. शार्दुलने गाबा कसोटीत ६७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तसेच गोलंदाजी करताना त्याने दोन्ही डावात मिळून ७ गडी बाद केले होते. त्यावेळी शार्दुल ठाकूरने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी सोबत चर्चा करून त्याला भरपूर मदत झाली होती.
शार्दुलने या मुलाखतीत म्हटले होते की, “मी अनेकदा त्यांना (धोनीला) विचारले आहे की, तुम्ही दबावाचा सामना कसा करता. त्यांनी एक खेळाडू, कर्णधार आणि पराभूत होत असलेल्या संघाचा खेळाडू म्हणून अनेकदा दबावाचा सामना केला आहे. तसेच धोनीला विजेता खेळाडू म्हणून खूप प्रेम मिळाले आहे. त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. जर येणाऱ्या क्रिकेटपटूंनी आपले डोळे आणि कान उघडे ठेवले तर धोनीकडून भरपूर काही शिकू शकतात.”
तसेच शार्दुल ठाकूर या मुलाखतीत पुढे म्हणाला होता की, “ते जेव्हा ही आपला अनुभव सांगत असतात, त्यावेळी आमच्याकडे शिकण्यासारखे भरपूर काही असते. ते असे खेळाडू आहेत, जे रोज काही ना काही सांगत असतात. जर एखादा खेळाडू ते शिकण्यासाठी हुशार असेल तर तो भरपूर काही शिकू शकतो.”
शार्दुल ठाकूर २०१८ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळतोय. २०१७ मध्ये त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स, तसेच २०१५-१६ मध्ये त्याने किंग्ज इलेव्हेन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते.(Shardul thakur reveals he learns from ms dhoni about dealing with pressure)
भारतीय संघाचा १५७ धावांनी दणदणीत विजय
भारतीय संघाने दिलेल्या ३६८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स या दोघांनी अर्धशतकं झळकावले होते. परंतु, ते दोघेही अर्धशतकांचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर कर्णधार जो रूट देखील स्वस्तात माघारी परतला होता. तसेच इंग्लंड संघातील इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, उमेश यादव, शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा डाव २१० धावांवर गुंडाळला होता. यासह भारतीय संघाने या सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
ओव्हल कसोटीनंतर भारतीय खेळाडूंची झाली कोरोना चाचणी, जाणून घ्या काय आला रिपोर्ट
‘जार्वो’ पुन्हा चर्चेत, भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचे मानले आभार; पण काय आहे कारण?
मैदानाबाहेर घेऊन गेल्यानंतर जार्वोसोबत नक्की काय घडले? पाहा हा व्हिडिओ