गोवा। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) बाद फेरीला (प्ले-ऑफ) शुक्रवारी (११ मार्च) पीजेएन स्टेडियम, फातोर्डा येथे खेळलेल्या जाणाऱ्या सेमीफायनल १ फर्स्ट लेग लढतीद्वारे सुरुवात होत आहे. या सामन्यात केरला ब्लास्टर्सविरुद्ध पहिल्यांदा लीग शील्डवर नाव कोरलेले जमशेदपूर एफसी विजयासाठी ‘हॉट फेवरिट’ आहेत.
जमशेदपूर एफसीसाठी आठवा हंगाम आजवरचा सर्वात सर्वोत्कृष्ट हंगाम ठरला आहे. त्यांनी २० सामन्यांत ४३ गुण मिळवलेत. हा एक रेकॉर्ड आहे. जमशेदपूरने १३ सामने जिंकताना तीन वेळा पराभव पाहिला आहे. चार सामने बरोबरीत सुटले. यंदाच्या हंगामात सर्वाधिक विजयही जमशेदपूरच्या नावावर आहेत. सलग सामने जिंकण्याचा अनोखा विक्रमही त्यांनी केला आहे. हंगामात सर्वाधिक गुण मिळवून लीग शील्ड पटकावल्याने जमशेदपूरचा आत्मविश्वास उंचावला आहे.
ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरने कमालीचे सातत्य राखले आहे. सांघिक कामगिरी उंचावण्यात ग्रेग स्टीवर्टचा मोठा वाटा आहे. त्याने १९ सामने खेळताना दहा गोल नोंदवताना तितकेच गोल असिस्ट केलेत. प्ले-ऑफ फेरीत स्टीवर्टचा सहभाग महत्त्वपूर्ण असेल. बाद फेरीत स्कॉटलंडचा हा फुटबॉलपटू सातत्य राखेल, असा विश्वास ओवेन यांना वाटतो. स्टीवर्टसह ट्रान्सफर विंडोमध्ये एससी ईस्ट बंगालकडून आलेल्या डॅनियल चिमा चुक्वु यानेही जमशेदपूरच्या सर्वोत्तम वाटचालीमध्ये मोलाची भूमिका ठरली आहे.
आयएसएलसह देशामधील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून आम्ही स्वत:ला सिद्ध केले. साखळीतील कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे. लीग शील्ड पटकावल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र, आता बाद फेरीला सुरुवात होत आहे. या फेरीत सातत्य राखण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. या फेरीत खेळताना मागील कामगिरी तितकी महत्त्वाची नाही. केरला एक चांगला संघ आहे. त्यांच्याकडे चांगले कोच आहेत. मात्र, आम्ही सर्वोत्कृष्ट खेळ करू, असे जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी सांगितले.
केरला ब्लास्टर्सने २०१६नंतर प्रथमच प्ले-ऑफ फेरीत धडक मारली आहे. आठव्या हंगामात अंतिम चार संघांत स्थान मिळवण्यासाठी त्यांच्यासमोर गतविजेता मुंबई सिटी एफसीचे आव्हान होते. मात्र, १० सामन्यांत ३४ गुणांसह त्यांनी चौथा क्रमांक राखला. केरलाकडे अल्वॅरो वॅस्केझ, जॉर्ज डियाझ, अड्रियन लुना आणि सहल अब्दुल समद असे चांगले खेळाडू आहेत. या फॅब फोरने ३४पैकी २६ गोलांमध्ये सहभाग नोंदवला आहे. अनेक गोल असिस्ट केलेत.
जमशेदपूर हा टफ संघ आहे. मात्र, उपांत्य फेरी हा नवा चॅप्टर आहे. नवा दिवस आणि नवा सामना आहे. शिवाय दोन्ही संघांना जिंकण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या मानसिकतेचा आणि कणखरतेचा कस लागेल, असे केरलाचे प्रशिक्षक इव्हान वुकोमॅनोविक यांनी म्हटले. जमशेदपूर नव्हे तर पुढील प्रत्येक सामन्यात आम्ही संपूर्ण खेळावर (१८० हून अधिक मिनिटे) लक्ष केंद्रित करणार आहोत. आमच्या बलस्थानाचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करू, असे वुकोमॅनोविक पुढे म्हणाले.
जमशेदपूर आणि केरला यांच्यातील साखळी फेरीत परतीच्या लढतीत जमशेदपूरने ३-० अशी बाजी मारली होती. मात्र, पहिल्या सामन्यांत बरोबरीत समाधान मानावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात है! जमशेदपूर एफसीची ऐतिहासिक कामगिरी, विक्रमासह प्रथमच जिंकली लीग शिल्ड!
जरा इकडे पाहा! आठ गोलांनंतरही गोवा अन् केरलामधील सामना सुटला बरोबरीत
‘एक नंबर’ कोणाचा?, जमशेदपूर- एटीके मोहन बागान यांच्या लढतीत होणार फैसला