इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात बुधवारी (१३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सचा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी झाला. या सामन्यात कोलकाताने ३ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने एक संथ खेळी करत स्वतःच्याच एका नकोशा आकडेवारीत भर टाकली.
धवनची संथ खेळी
नाणेफेक गमावल्यामुळे दिल्लीला प्रथम फलंदाजी करावी लागली. अनुभवी सलामीवीर शिखर धवनने डावाच्या चौथ्या षटकात केकेआरचा प्रमुख फिरकीपटू सुनील नरीनला सलग दोन षटकार खेचले. मात्र, त्यानंतर तो धावांसाठी झगडताना दिसला. वरूण चक्रवर्तीच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने ३९ चेंडूवर ३६ धावा काढल्या. त्यामध्ये दोन षटकार व एका चौकारांचा समावेश होता.
स्वतःच्या नकोश्या विक्रमात घातली भर
धवनने या सामन्यात ही कासवगती खेळी करताना स्वतःच्याच एका नकोशा विक्रमात भर घातली. ३५ पेक्षा जास्त चेंडू खेळून खेळलेली ही त्याची तिसरी सर्वात संथ खेळी ठरली. त्याने यापूर्वी २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ३९ चेंडूचा सामना करताना केवळ ३३ धावा बनविल्या होत्या. त्यानंतर, २०१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना त्याने ३७ चेंडूत ३४ धावा केलेल्या.
केकेआरचा अंतिम फेरीत प्रवेश
शारजा येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना शिमरन हेटमायर, श्रेयस अय्यर व शिखर धवन यांच्या छोटेखानी खेळ्यांच्या जोरावर १३५ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, व्यंकटेश अय्यर व शुबमन गिल यांनी ९६ धावांची सलामी देत सामना केकेआरच्या बाजुने झुकविला. त्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी झटपट ७ बळी मिळवत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, केकेआरच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत धैर्य दाखवात सामना आपल्या नावे केला. अंतिम सामना चेन्नईविरुद्ध दुबई येथे खेळला जाईल.