कोलंबो। रविवारी (१८ जुलै) भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध आर प्रमेदासा स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने १-० अशी वनडे मालिकेत आघाडी घेतली. भारताच्या पहिल्या वनडेतील विजयात प्रभारी कर्णधार शिखर धवनने नाबाद अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबर खास विक्रमही केला.
कर्णधार शिखर धवनचा मोठा विक्रम
श्रीलंका दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी झालेला सामना शिखरचा कर्णधार म्हणून पहिलाच वनडे सामना होता. कर्णधार म्हणून पहिलाच वनडे सामना खेळताना शिखरने ९५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ८६ धावा केल्या.
त्यामुळे तो कर्णधार म्हणून पहिल्याच वनडे डावात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा ६ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी अजित वाडेकर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, अजय जडेजा आणि एमएस धोनी यांनी कर्णधार म्हणून पहिल्या वनडे डावात ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यातील सचिन तेंडुलकर हा एकमेव भारतीय आहे, ज्याने नेतृत्व करताना पहिल्या वनडे डावात शतकी खेळी केली आहे. त्याने १९९६ साली श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा वनडेत कर्णधार म्हणून खेळताना ११० धावा केल्या होत्या.
तसेच कर्णधार म्हणून पहिला वनडे सामना खेळताना सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत शिखर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिन या यादीत ११० धावांच्या खेळीसह अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर आता शिखरचा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या क्रमांकावर अजित वाडेकर आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्ध १९७५ साली कर्णधार म्हणून पहिला वनडे सामना खेळताना ६७ धावांची खेळी केली होती.
सर्वात वयस्कर कर्णधार
शिखर जेव्हा श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडे कर्णधार म्हणून उतरला, तेव्हा तो भारताचा कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणारा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरला. पहिल्या वनडे सामन्यावेळी त्याचे वय ३५ वर्षे २२५ दिवस होते. तसेच शिखर भारताचा एकूण ४० वा कर्णधार, तर वनडेतील एकूण २५ वा कर्णधार ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
खेळाडू, कर्णधार म्हणूनच नाही, तर प्रशिक्षक म्हणूनही पहिल्या वनडेत द्रविडच्या पारड्यात विजयच
टी२० पाठोपाठ वनडे पदार्पणातही इशान किशनचे अर्धशतक; ‘या’ विश्वविक्रमाच्या यादीत मिळवले स्थान
वाढदिवशी ‘अशी’ अद्वितीय कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज बनला इशान किशन