रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. यासह न्यूझीलंडनं भारतात प्रथमच कसोटी मालिका जिंकली आहे. याशिवाय भारतानं तब्बल 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली.
न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ दोन सामने गमावल्यानंतर रोहितवर सध्या चांगलीच टीका होत आहे. अशा परिस्थितीत आता रोहितचा खास मित्र आणि भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन त्याच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. धवन न्यूझीलंड विरुद्धचा पराभव चिंतेचा विषय मानत नाही.
केवळ एक मालिका गमावल्यानंतर रोहितवर शंका घेणं अयोग्य असल्याचं धवनचं मत आहे. तो ‘इंडिया टुडे’शी बोलताना म्हणाला, “तुम्ही ज्या दबावाबद्दल बोलत आहात ते आम्हाला वाटत नाही. खेळात दडपण असलं तरी विजय-पराजयाचा आमच्यावर परिणाम होत नाही. हा खेळाचा एक भाग आहे.” रोहितचा संघाशी असलेला संबंध खूप मोलाचा आहे, असं धवनचं मत आहे. धवन म्हणाला, “रोहित उत्तम कर्णधार आहे. हा केवळ विजय किंवा पराभवाचा मुद्दा नाही. संघातील सदस्य त्याचा खूप आदर करतात.”
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यानंतर भारताला 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिले एक किंवा दोन कसोटी सामने खेळू शकणार नाही. मात्र, बीसीसीआयनं संघ जाहीर करताना याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही.
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या संधीबाबत धवन आशावादी आहे. तो म्हणाला, “रोहित पहिला सामना खेळो की न खेळो, भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खूप चांगली कामगिरी करेल. अर्थातच संघ त्याची उपस्थिती आणि अनुभवाला मुकणार आहे.”
हेही वाचा –
सलग पराभवानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! हे 3 खेळाडू होऊ शकतात तिसऱ्या कसोटीतून बाहेर
केएल राहुलला नारळ! लखनऊ सुपर जायंट्सनं रिटेन केले हे 5 खेळाडू
रणजी ट्रॉफीमध्ये केकेआरच्या गोलंदाजाची धमाल कामगिरी, बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ठोकला दावा