टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन नेहमीच आपल्या स्वभावामुळे चर्चेत असतो. मैदानातली त्याची खेळी असो किंवा मैदानाबाहेरील आयुष्य ‘गब्बर’ नेहमीच आनंदी राहणं पसंत करतो. आता धवननं आपल्या आत्मचरित्रात एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे, जो थेट त्याच्या प्रेमप्रकरणाशी जोडलेला आहे.
शिखरने उघड केलं की 2006 मध्ये भारत A संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने आपल्या गर्लफ्रेंडला थेट हॉटेलच्या खोलीत नेलं होतं, तो ती खोली रोहित शर्मासोबत शेअर करत होता. धवनच्या म्हणण्यानुसार, त्याच्या या वागणुकीमुळे रोहितने एकदा हिंदीत चिडून विचारलं होतं, “भाई, सोने देगा क्या?”
या आत्मचरित्रात धवननं लिहिलंय, “ती खूप सुंदर होती आणि पुन्हा एकदा मला तिच्यावर प्रेम झालं. मला वाटलं हीच माझी जोडीदार आहे. मी तिला लग्नासाठी निवडणार आहे.” सुरुवातीला मैदानात त्याचा फॉर्म छान होता, पण जसजसा तो ‘एलेन’ (खरं नाव नाही) सोबत वेळ घालवू लागला, तसतसा त्याचा खेळावरील फोकस कमी होऊ लागला.
गब्बर पुढे लिहितो, “प्रत्येक सामन्यानंतर मी तिच्याशी भेटायला जायचो आणि नंतर तिला हॉटेलच्या रूममध्ये आणू लागलो. रोहितने काही वेळा हिंदीत त्रासून सांगितलं, “भाई, सोने देगा क्या?”
या गोष्टीची लवकरच टीममध्ये चर्चा होऊ लागली, कारण एका सीनिअर सिलेक्टरनं दोघांना हॉटेल लॉबीमध्ये हातात हात घालून चालताना पाहिलं होतं. धवन म्हणतो, “माझ्या डोक्यातही आलं नाही की तिचा हात सोडायला हवा. मला वाटत होतं की आम्ही काही चुकीचं करत नाही. पण त्यानंतर सगळ्या टीममध्ये आमचं नातं चर्चेचा विषय बनलं.”
धवनच्या मते, जर त्याने त्या दौऱ्यात चांगली कामगिरी कायम ठेवली असती, तर कदाचित लवकर भारतीय सीनिअर संघात स्थान मिळालं असतं. मात्र त्याचा फॉर्म घसरत गेला आणि संधी हुकली.