चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे यानं गुजरात टायटन्सविरुद्ध तुफानी खेळी केली. दुबेनं 23 चेंडूत 51 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 2 चौकार आणि 5 षटकार मारले. या आधी आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात शिवम दुबेनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 28 चेंडूत 34 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
आयपीएलमध्ये शिवम दुबे चेन्नई सुपर किंग्जसाठी एक्स फॅक्टर ठरत आहे. हा अष्टपैलू खेळाडू आपल्या फलंदाजीनं चेन्नईच्या संघात मोठं योगदान देतोय. विशेषत: शिवम दुबेला शेवटच्या षटकांमध्ये रोखणं विरोधी गोलंदाजांना कठीण जात आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर ही गोष्ट सिद्ध होते. चेन्नई सुपर किंग्जसाठी शिवम दुबेचे आकडे आश्चर्यकारक आहेत.
आकडेवारीनुसार, शिवम दुबेनं आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडून 27 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 158.4 चा स्ट्राइक रेट आणि 36 च्या सरासरीनं 792 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं 6 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला. याशिवाय शिवम दुबेनं चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना 40 चौकार आणि 57 षटकार मारले आहेत. यापूर्वी शिवम दुबे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सचा भाग होता. परंतु त्या संघांसाठी त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही.
मात्र महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये येताच दुबेचा गेम बदलला. तो संघासाठी सातत्यानं चांगलं प्रदर्शन करत आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडनंही हे बोलून दाखवलं आहे. “माही भाईनं (एसएस धोनी) स्वत: शिवम दुबेकडे लक्ष दिलं. याचे परिणाम आपण त्याच्या कामगिरीमध्ये पाहू शकता”, असं ऋतुराज म्हणालाय.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सचा 63 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. चेन्नईच्या विजयात शिवम दुबेनं मोठं योगदान दिलं. दुबेच्या झंझावाती खेळीच्या जोरावर सीएसकेनं 20 षटकांत 6 गडी गमावून 206 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना गुजरात टायटन्सचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 143 धावाच करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीसमोर ऋतुराज फक्त रिमोट कंट्रोल कर्णधार? दीपक चहरनंही घेतली मजा
टी20 क्रिकेटमध्ये हे दुर्मिळच! गुजरातविरुद्ध ऋतुराज-रहाणेचा अनोखा कारनामा